रेवदंडा बाजारपेठेला वाहतूक कोंडीचा फटका

ऐन गणेशोत्सवात वाहनांची वर्दळ वाढली


| रेवदंडा | प्रतिनिधी |

ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा बाजारपेठेत ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. परिणामी, ग्राहकांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीचा मोठा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे.

अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्याला मध्यवर्ती ठिकाण असलेले रेवदंडा शहरातील बाजारपेठ ऐन गणेशोत्सवामध्ये नित्याने गर्दीची असते. आजूबाजूच्या विविध गावासह रेवदंडा, थेरोंडा, चौल, आग्राव आदी पंचक्रोशीतील ग्राहकवर्ग विविध खरेदीच्या निमित्ताने रेवदंडा बाजारपेठेत येतो. रेवदंडा बाजारपेठेतील अगोदरच अरूंद असलेल्या रस्ता या गर्दीने वाहनांची ये-जा करताना समस्या निर्माण करते. मुख्यः रस्ता अरूंद असल्याने पार्किंग समस्यासुध्दा निश्चितच जाणवते. बाजारपेठेतील अरूंद रस्त्यात पार्किंग सुविधा उपलब्ध होत नसल्याने बाजारपेठेत गर्दीच्या वेळी रस्त्यात वाहतुकीची कोंडी निर्माण होते.

रेवदंडा बाजारपेठ मुख्य बाजारपेठ असून, पंचक्रोशीतून ग्राहकवर्ग खरेदीसाठी येथे येतो. प्रामुख्याने रेवदंडा पारनाका येथे गर्दी मोठी होते. येथे गणेशौत्सवात बाहेरील गावागावातून मोटारसायकल, रिक्षा, चारचाकी वाहनांनी खरेदी करता आलेल्या ग्राहकांना पार्किग सुविधा सुध्दा उपलब्ध होत नाही. शिवाय मुख्यः रस्त्याने मुरूड व अलिबागकडे नित्याची वाहतुक सुरू असते, ऐन गणेशोत्सवात या बाजारपेठेतील मुख्यः रस्त्यातील वाहतुकसुद्धा जास्तच असते, प्रवासी एस.टी. बसेस, तसेच अन्य मोठी वाहने यांचे जा-ये गणेशोत्सवाचे निमित्ताने जास्त असते. या सर्व बाबीचा भार रेवदंडा बाजारपेठेतील अरूंद रस्त्याला निश्चित मोठया प्रमाणात जाणवतो, परिणामी बाजारपेठेत वाहतुक कोंडी समस्या निर्माण होते.

या वर्षी गणेशौत्सवात होत असलेल्या वाहतुक कोंडीच्या समस्येबाबत रेवदंडा पोलिस मोठा बदोबस्त तैनात करेल, व निश्चितपणे वाहतुक सुरळीत ठेवीत वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी निकराने प्रयत्न करणार असे पोलिस ठाणे इन्चार्ज सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल अतिग्रे यांनी रेवदंडा व्यापारी असोसिएशनच्या सभेत सांगितले आहे.

Exit mobile version