घरफोडी सारख्या गुन्ह्यांची नोंद करण्यास दिरंगाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाजने येथे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दोन घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या. मात्र, आठ ते दहा दिवस उलटून गेले तरी रेवदंडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तक्रार उशिरा दिल्याचे कारण तक्रारदारावर ढकलण्याचा प्रताप पोलिसांकडून होत असल्याने रेवदंडा पोलिसांचा अजब कारभार उघड झाला आहे.
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील दोन ठिकाणी घरफोडी झाली. महाजने येथे पारंगे यांच्या घरातील सोन्याचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यावर तेथील एका पोलिसाकडून अर्ज करून मुद्देमाल गेलेला लिहून घेऊन या, असे सांगण्यात आले. यावेळी 16 ते 27 नोव्हेंबरच्या कालावधीत झालेल्या गुन्ह्याची नोंद 1 डिसेंबरला करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले की, तक्रारदार यांनी नातेवाईक व शेजारी यांच्याकडे दागिन्याची चौकशी केली. परंतु, ते मिळून न आल्याने त्यांनी उशीरा तक्रार दाखल केली, असे कारण पोलिसांकडून हकिकतमध्ये स्पष्ट करण्यात आले. तसेच, नोव्हेंबर महिन्यामध्ये रेवदंडा मोठा कोळीवाड्यातील एका मंदिरात घुसून चोरट्यांनी चांदीचे चार देव, देवीचा चांदीचा मुखवटा लंपास केल्याची माहिती स्थानिकांकडून उपलब्ध झाली. मात्र, त्याची नोंदही तात्काळ करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे रेवदंडा पोलिसांनी त्यांच्याकडील चुक सर्वसामान्यांकडेच ढकलल्याचे समोर येत आहे.
महाजनेमध्ये वारंवार चोरी, घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्याचा मात्र अद्यापर्यंत तपासच लागला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाजने येथील चोरी, घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यास पोलीस यशस्वी ठरतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस दलातील कामकाज गतीमान व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आधुनिकतेचा आधार घेतला आहे. मात्र, गतीमान फक्त पोलीस अधीक्षक कार्यालयापुरताच मर्यादीत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
तक्रारदार तक्रार देण्यास आल्यास तात्काळ त्याची नोंद करणे आवश्यक आहे. तक्रार करण्यास उशीर करणे चुकीचे आहे.
माया मोरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी







