| अलिबाग | प्रतिनिधी |
सातबाऱ्यावरील नोंदीच्या प्रलंबित कामासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागणारा महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात अडकला. नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईने लाच घेणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दणका मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास मनोहर बोंडले (34) असे या महसूल सहाय्यकाचे नाव आहे. हा श्रीवर्धन तहसील कार्यालयातील कर्मचारी आहे. तक्रारदार याने सातबारा नोंदीसाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. गेले अनेक दिवसांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. विकास बोंडले याने सातबारा उताऱ्यावर नाव नोंदीच्या प्रलंबित कामांसाठी 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार याने नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी तक्रारीचे गांभीर्य ओळखून कारवाई सूरू केली. पडताळणीमध्ये बोंडले याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बोंडले याच्याविरोधात श्रीवर्धन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीवर्धन तहसील कार्यालयात वारस नोंदीचे प्रकरण कायमच प्रलंबित असल्याची चर्चा आहे. ही प्रकरणे वेळेत मार्गी लागत नाही. अर्जदारांना त्यांच्या चप्पला झिजवाव्या लागतात. तरीदेखील तहसील कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची चर्चा आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने लाच घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दणका मिळाला आहे.