नगरपालिकेच्या जागांवर अतिक्रमणांचा सुळसुळाट
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषद हद्दीत नगरपालिका मालकीच्या जागांवर बेकायदेशीर अतिक्रमणांचे प्रमाण वाढत असून, सरकारी जागांवर परवानगीशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. विशेषतः मुख्य मार्गावरील सरकारी दवाखान्याच्या जागेत अनधिकृत ‘भाकरी सेंटर’ सुरू असल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्या दवाखान्याची इमारत पाडल्यानंतर उभारलेल्या शेडमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी न घेता चुली लावून भाकरी भाजून विक्री केली जात आहे. मात्र, हा प्रकार एकटाच नसून शहरातील इतरही अनेक नगरपालिका जागांवर अशाच प्रकारे अतिक्रमण करून व्यवसाय सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या अतिक्रमणांमुळे नगरपालिकेचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यासोबतच, प्रशासनाकडून कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत असून, अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.नगरपालिका मालमत्तेचा उघडपणे गैरवापर होत असतानाही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. सर्व बेकायदेशीर अतिक्रमणांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, बुडालेला महसूल वसूल करावा तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी उरणकरांकडून जोर धरत आहे.
