नवव्या दिवशीही महसूल कर्मचार्‍यांचा संप सुरूच; कामकाज ठप्प


। कर्जत । प्रतिनिधी ।
दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील शेकडो महसूल कर्मचारी 4 एप्रिल पासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाचा मंगळवारचा नववा (9) दिवस होता, यामुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील महसूल विभागातील कामकाज ठप्प झाले आहे.
राज्यातील महसूल विभाग आणि जिल्ह्यातील महसूल संघटनांनी 21 मार्च 2022 पासून निदर्शने, काळ्या फिती लावून काम, एक दिवसाचा लाक्षणिक संप अशी आंदोलने केली आहेत. तरीही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. विविध मागण्यांबाबत 4 एप्रिल पासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
राज्य महसूल कर्मचारी संघटना पदाधिकारी यांची दि.7 एप्रिल रोजी शासना सोबत मुंबई येथे बैठक झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शासन मागण्यांसाठी ठोस निर्णय घेण्याचा मनस्थितीत नाही असे दिसून आले होते. त्यामुळे आमच्या मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमचे हे आंदोलन, संप सुरूच राहणार आहे असे पदाधिकारी यांनी सांगितले होते. दरम्यान मंगळवारी कर्जत तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांची रायगड जिल्हा अध्यक्ष केतन भगत, सरचिटणीस भूषण पाटील, कार्याध्यक्ष गोवर्धन माने, कर्जत उपविभाग अध्यक्ष संदीप गाढवे, तालुका अध्यक्ष रवी भारती यांनी भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली.

शासन जो पर्यत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यत बेमुदत संप सुरूच राहणार आहे.

केतन भगत-(जिल्हा अध्यक्ष)
Exit mobile version