कृषीवलच्या दणक्याने ‌‘महसूल’ला जाग

कारवाईचा मात्र दिखावा

| पेण | प्रतिनिधी |

‌‘आमटेम-निगडे खाडीमध्ये अवैध वाळू उत्खनन?’ या मथळ्याखाली बुधवारी कृषीवलमध्ये बातमी प्रकाशित होताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. महसूलचे अधिकारी तातडीने आमटेम निगडे खाडीच्या पुलाखाली पोहोचले. खाडी किनारी दहा ते बारा ब्रास वाळू सक्शनद्वारे काढली होती, अशीही माहिती मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात एक ब्रासच वाळू कारवाईत जप्त केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, वाळूमाफियांनी अधिकाऱ्यांवर अशी काही जादू केली की अधिकाऱ्यांनी फक्त एक ब्रास वाळू जप्त करुन पेण प्रांत कार्यालयाच्या आवारात आणली, असे बोलले जात आहे. दरम्यान, उरलेली वाळू व रेजगा कोठे गायब झाला की, नऊ ते अकरा ब्रास वाळू अधिकाऱ्यांनी दाखवली नाही, अशी उलटसुलट चर्चा सुरू आहे. याचा अर्थ, महसूलचे कनिष्ठ कर्मचारी वरिष्ठांची दिशाभूल करीत असल्याचा सरकारी नियमानुसार जप्त केलेल्या वाळूला पाचपट दंड आकारला जातो. मात्र, जप्त केलेल्या वाळूचा मालक कोण? याबाबतच अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्याने वाळूमाफियांना अधिकारी वर्ग तर पाठीशी घालत नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकाराबाबत पेण तहसीलदार चौकशी करीत आहेत.

Exit mobile version