आता रोहा-पनवेल फक्त 20 रूपयांत
| नागोठणे | वार्ताहर |
कोविड-19 महामारीच्या काळात रेल्वे सेवा ठप्प झाली होती. कोरोनाच्या संकटापासून थोडासा दिलासा मिळाल्यानंतर भारतीय रेल्वेने एक्स्प्रेस रेल्वे सुविधा सुरु केली होती. मात्र, लोकल सेवा बंद असल्याने जवळच्या थांब्यांवर जाण्यासाठीही रेल्वेने दुप्पट तिकीट आकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामुळे त्रस्त झालेल्या प्रवासी वर्गातून याबाबत वारंवार तक्रारी होऊ लागल्याने आता रेल्वेने आपल्या नवीन धोरणानुसार जवळच्या स्थानकातील प्रवासासाठी आपले जुनेच दर लागू केल्याने आता रोहा-पनवेल प्रवासासाठी एक्स्प्रेसचे तिकीट दर रु. 40 रद्द करुन (दि.22) फेब्रुवारीपासून पूर्वीप्रमाणेच फक्त रु. 20 हे जुने दर लागू केल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नागोठण्यात स्थापन करण्यात आलेल्या विभागातील तसेच पाली, कोलाड भागातील प्रवाशांच्या नागोठणे प्रवासी संघटना यांच्यावतीने मध्य रेल्वेकडे वारंवार निवेदने सादर करुन प्रवाशांच्या विविध समस्यांबाबतीत लक्ष वेधले होते. तसेच प्रवासी संघटनेने आपल्या निवेदनातून केलेल्या विविध मागण्यांसह मेमू ट्रेनसाठी रोहा ते पनवेल आकारण्यात येणाऱ्या 40 रुपयांऐवजी पूर्वीप्रमाणेच 20 रूपये तिकीट दर आकारण्याची मागणी करुन यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार रोहा, नागोठणेवरुन आता पनवेलला 20 रूपयांत जाता येणार असल्याने प्रवाशांत आनंदाचे वातावरण आहे. याबद्दल नागरिक नागोठणे प्रवासी संघटनेचे आभार व्यक्त करीत आहेत.