मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून आढावा

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज असून, प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे (भाप्रसे) म्हणून यांची आणि निवडणूक निरीक्षक म्हणून मनिषा कुंभार (अप्पर जिल्हाधिकारी) यांची नेमणूक झाली आहे. निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत निवडणुकविषयक सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक महापालिका मुख्यालयात घेतली. या बैठकीत निवडणूक विषयक झालेल्या सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.

पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांनी निवडणूक विषयक झालेल्या सर्व कामकाजाची संक्षिप्त माहिती निरीक्षकांना दिली. यामध्ये ईव्हीएम व्यवस्थापन, शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयाने केलेले नियोजन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि प्रशिक्षण, निवडणूक साहित्यविषयक तयारी, विविध पथके आणि नोडल अधिकाऱ्यांमार्फत केले जाणारे कामकाज याबाबत माहिती दिली. यावेळी निरीक्षकांनी निवडणूक विषयक विविध कामांची सद्यस्थिती जाणून घेऊन विविध सूचना दिल्या. निवडणूकविषयक जबाबदाऱ्या पार पाडताना केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे सांगितले.

मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) व्यवस्थापनाबाबत माहिती घेताना निरीक्षकांनी याबाबत झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, यंत्रांची सिलिंग व सुरक्षा, याबाबतचे रेकॉर्ड राखणे इत्यादी कामकाजाचा आढावा घेतला. विशेष मतदान केंद्रे स्थापन करताना आदर्श मतदान केंद, पिंक मतदान केंद्र, ग्रीन मतदान केंद्र याबाबत माहिती घेतली. दिव्यांग बांधवांसाठी मतदान केंद्रांवर केलेल्या सोईसुविधांवर चर्चा करताना सद्यस्थितीतील सोईसोबत दिव्यांग बांधवांसाठी अधिकचे तात्पुरते रॅम्प उभारले जाणार असल्याबाबत चर्चा झाली. स्वीप कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती देताना नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे जनजागृती करताना मतदान जास्तीत जास्त वाढविण्याबाबत लक्ष्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

मतदान केंद्रावर अत्यावश्यक व आरोग्यविषयक सुविधांबाबत आढावा यावेळी निवडणूक निरीक्षकांनी घेतला. आचारसंहितेचे कडक पालक करण्याच्या दृष्टीने खर्च, मद्य वाटप, अवैध वस्तूंची वाहतूक याबाबत स्थिर सर्वेक्षण पथके, व्हिडीओ व्हीव्हिंग पथके, भरारी पथके या विविध पथकांच्या तसेच पोलीस विभाग, परिवहन विभाग, उत्पादन शुल्क विभाग या विविध विभागांच्या समन्वयाने चालू असलेल्या कामकाजाबाबत माहिती घेतली. मनुष्यबळ व्यवस्थापनाबाबत माहिती घेताना एकूण 3625 कर्मचाऱ्यांचे झालेले प्रशिक्षण, कामकाजाचे केलेले वाटप, प्रशिक्षणाचे विविध टप्पे आणि कालावधी, तयार करण्यात आलेली एकूण 725 पथके याबाबत चर्चा झाली.

मतदानासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्य व्यवस्थापनाचा आढावा घेताना सर्व साहित्यविषयक तयार पूर्ण झाली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार तात्काळ साहित्य पुरवले जात असल्याचे सांगितले. निवडणूक विषयक कामकाज अत्यंत शिस्तबद्ध चालू असल्याबाबत निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.

Exit mobile version