शासकीय, निमशासकीय विभागाच्या कर्मचारी उपस्थित
| अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत मान्सून-2023 पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हा नियोजन भवन येथे मंगळावार (दि.25) रोजी आयोजित घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी हा आढावा घेतला.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई वाहतूक उपायुक्त तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पदमश्री बैनाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच विविध शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पदमश्री बैनाडे यांनी प्रास्ताविकात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे आपत्ती व्यवस्थापन, त्याबाबतची पूर्वतयारी, आवश्यक उपाययोजना, जिल्ह्याची भौगोलिक रचना, हवामान, याबाबत उपस्थित अधिकार्यांना माहिती दिली.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या सर्व संबंधित विभागप्रमुखांनी नैसर्गिक आपत्तीकाळातील तसेच मान्सूनपूर्व तयारीसाठीच्या अनुषंगाने करावयाच्या आवश्यक बाबी तसेच त्यांच्या कर्तव्य व जबाबदार्या याबाबत आदेशित करण्यात आल्या. लाईफ जॅकेट्स, लाइफ बोयाज व रिंगस, रबर बोट, होड्या इत्यादी साहित्यांची उपलब्धता याबाबत खात्री करावी. खासगी साहित्याची, यांत्रिक बोटी, रबरी बोटी, छोट्या होड्या इत्यादीची उपलब्धता तपासावी. रुग्णवाहिका, जेसीबी, गॅस कटर, पोकलेन, पाण्याचे टँकर, वॉटर बॉटल्स, ड्रायफूट पॅकेट्स, जनावरांसाठी औषधांचा साठा, चारा इत्यादी आवश्यक साहित्य तात्काळ उपलब्ध होईल याबाबत पूर्ण तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, नागरिक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी या सर्वांनी आपआपसातील उत्तम समन्वयाने नैसर्गिक आपत्ती काळात उद्भवणार्या परिस्थितीवर एकजुटीने मात करु, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.