| पनवेल | वार्ताहर |
नांदेड, ठाणे, नागपूर येथील सरकारी रुग्णालयमधील एका दिवसात मोठ्या प्रमाणात झालेल्या मृत्यू पाहता महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र दिसत आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासकीय आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्याकरिता मंगळवारी शिव आरोग्य सेना (ठाकरे गट) यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पनवेल उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्यक्ष भेट देत आरोग्यवस्थेची पाहणी केली. रुग्णालयात असलेल्या आरोग्य सेवे बाबत प्रश्नांचा भडिमार केल्याने वैद्यकीय अधीक्षक यांना प्रश्नाचे उत्तर देणे कठीण झाले. शिव आरोग्य सेना नेहमीच डॉक्टरांचा आदर करत आली असून रुग्णसेवा करताना येणाऱ्या समस्या आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी आम्ही पाठीशी उभे राहू असे पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना सांगितले.
रुग्णांशी बातचीत करून तिथे मिळत असलेल्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला आणि काही कमतरता दिसून आल्यानंतर तेथील वैद्यकीय अधीक्षकांना त्या गोष्टी तिथेच निदर्शनात आणून त्वरित त्यावर अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले. त्याला त्वरित प्रतिसाद देत लवकरच कमतरतेची पूर्तता केली जाईल असे आश्वासन डॉक्टरांनी दिले. काही जीवनावश्यक औषधांचा तुटवडा याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारले असता त्याबद्दल आम्ही वरिष्ठांना पत्रव्यवहार केला असून आठ ते दहा दिवसात मुबलक प्रमाणात औषधांचा पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले, तसेच काही जीवनावश्यक औषधे स्थानिक खरेदी वर घेण्याचे अधिकार वैद्यकीय अधीक्षकांना असल्याचे सांगण्यात आले. तसेच सर्व समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असे आश्वासन दिले.
रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ.परेश चंद्रकांत देशमुख, शिवसेना खांदा कॉलनी शहर संघटिका श्रीमती सिंधुताई कुलकर्णी, शिव आरोग्य सेनेचे खारघर शहर संपर्क समन्वयक सचिन सावंत, खांदा कॉलनी कॉलनी शहर समन्वयक अर्चना क्षीरसागर, कळंबोली शहर संघटक अस्मिता नाईक आणि शिवसैनिक उपस्थित होते.