| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मृग नक्षत्राने चांगली सुरुवात करुन दिल्याने मुरुड तालुक्यातील शेतकर्यांनी भात बियाण्यांची पेरणी केली होती. बियाण्याची रुजवणही चांगली झाल्यानंतर मात्र पावसाने ओढ दिल्याने जमीन सुकल्याने राब धोक्यात आले होते; परंतु गेल्या मंगळवारपासून पावसाला पुन्हा प्रारंभ झाला असून, मृग नक्षत्राने जाता-जाता राबांना संजीवनी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायत हद्दीतील 74 गावांचे एकूण भौगोलिक क्षेत्र 26 हजार 525 हेक्टर असून, त्यापैकी 3100 हेक्टर क्षेत्रावर खरीप भातपिकाची लागवड केली जाते. त्यासाठी येथील शेकडो शेतकरी आपापल्या शेतीसाठी 700 क्विंटल विविध प्रकारच्या बियाण्यांची मागणी करतात. तर 1270 मेट्रिक टन रासायनिक खताची गरज त्यांना लागते. भाताच्या बियाण्यात सुवर्णा, जया, सोनम, रत्ना, वाडा कोलम, कर्जत 35, रत्नागिरी, फोंडाघाट पनवेल, पालघर, मसुरी कोलम आदी सुधारीत बियाण्यांसह जिना कोलम, भडस आदी जुन्या बियाण्यांचा समावेश आहे. तालुक्यात शंभराहून अधिक शेतकरी गट कार्यरत आहेत.
मुरुड तालुक्यात 2435.58 मि.मी. सरासरीने दरवर्षी पाऊस पडतो. तरीही 300 ते 400 हेक्टरहून अधिक जमीन पडीक आहे. येथील कित्येक शेतकर्यांनी शेती परवडत नसल्याने आपली पिकती जमीन अक्षरशः ओसाड टाकली आहे. कारण, दिवसेंदिवस वातावरणात होणारे बदल, पावसाची अनियमितता, सिंचनाच्या सोयी नसणे आदी कारणांसह बैलांच्या नांगराची एका दिवसाची 600 रु. मजुरी, यांत्रिक ट्रॅक्टर एका तासाला 700 रु. मजुरी, कामगारांपैकी पुरुष दिवसाची मजुरी 500 रु., तर स्त्रियांना 300 ते 400 रु. मजुरी अशा प्रकारे पेरणीपासून ते मळणीपर्यंत हजारोंचा खर्च शेतकर्यांना परवडत नाही. त्यापेक्षा दुकानातील 50 ते 70 रु.कि.ग्रॅ.ने तयार तांदूळ विकत घेणे त्यांना परवडते. याखेरीज केंद्र शासनाने पिवळ्या व केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ व गहू देण्याच्या योजनेमुळे शेतीत काम करून धान्य पिकवण्याकडे सर्वसामान्य अक्षरशः दुर्लक्षच करीत आहेत. परिणामी, स्वतःच्या मालकीची शेती असली तरी ती कसण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
शिवाय तालुक्यातील भातशेती समुद्र व खाडीकिनारी असल्याने व तेथे व्यवस्थित बांधबंदिस्ती नसल्याने समुद्राचे खारे पाणी शेतात घुसून जमीन नापीक बनत आहे. तालुक्यातील जवळपास 800 हेक्टर जमीन खारफुटीने म्हणजेच खाजण जमिनीने व्यापली आहे. त्यामुळे कोणे एकेकाळी मुरुडमधील शेतकरी आपल्या नारळ-सुपारीच्या बागायतींच्या जोडीला भातशेतीची जोड देत असत. त्यामुळे उत्तम शेती, मध्यम बागायत व कनिष्ठ नोकरी अशी वर्गवारी येथील नागरिक करीत असत. एकेकाळी रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार संबोधले जात असताना मुरुड तालुक्यातील भातशेतीचा समावेशही त्यात होत असे. परंतु, या नापिकीपणामुळे हे भाताचे कोठारच रिते राहू लागले आहे.