रायगडावर दारूगोळा कोठारांचे जतन-संवर्धन सुरू
| रायगड | प्रतिनिधी |
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून, याअंतर्गत दारूगोळा कोठारांच्या जतन-संवर्धनाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या परवानगीने, रायगड विकास प्राधिकरणामार्फत हे जतन-संवर्धनाचे काम सुरू असून गडाच्या वैभवशाली इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय पुन्हा उलगडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
किल्ल्यावरील ही दारूगोळा कोठारे गडाच्या दक्षिण कड्याजवळ, वाघ दरवाजाच्या पूर्वेकडील उंच भागात आणि बारा टाक्यांच्या दक्षिणेस स्थित असून त्यांची रचना उत्तर-दक्षिण दिशेत करण्यात आलेली आहे. या दारूगोळा कोठारांची उंची, भिंतींची जाडी आणि बांधकाम पद्धती पाहता ती लष्करी दृष्टिकोनातून अत्यंत सक्षम आणि सुरक्षित रचना असल्याचे स्पष्ट होते. शिवकालीन काळात दारूगोळ्याच्या साठवणुकीसाठी अशा कोठारांना विशेष महत्त्व होते. प्राधिकरणामार्फत पहिल्या टप्प्यात या वास्तूंचे शास्त्रोक्त दस्तऐवजीकरण सुरू करण्यात आले आहे.
यात मोजमाप, नकाशे तयार करणे, छायाचित्रण व संरचनेचे तांत्रिक विश्लेषण यांचा समावेश आहे. प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे यांनी या दारूगोळा संवर्धन ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. या वेळी रायगड प्राधिकरणचे अभियंता अविनाश बुर्ले उपस्थित होते. रायगडावरील जतन व संवर्धन यामुळे गडावरील दुर्लक्षित वास्तूंना नवसंजीवनी मिळत असून, गडाच्या ऐतिहासिक आणि स्थापत्य वारशाचे जतन अधिक प्रभावीपणे होणार आहे. यामुळे भविष्यात पर्यटक, संशोधक आणि इतिहास अभ्यासकांना रायगडाचा अभ्यास अधिक सखोलपणे करता येणार आहे.
संवर्धनादरम्यान महत्त्वाचे शोध
भिंतींवर वाढलेली झाडी-झुडपे केमिकल फवारणीद्वारे काळजीपूर्वक हटविण्यात आली असून, या प्रक्रियेदरम्यान कोठाराच्या दक्षिण भिंतीवर ब्रिटिशांनी पोटल्या डोंगरावरून केलेल्या तोफगोळ्यांच्या माराचे ठसे स्पष्टपणे आढळून आले आहेत. हे ठसे गडावरील युद्धकालीन हालचालींचे महत्त्वपूर्ण पुरावे मानले जात आहेत.
कोठाराच्या आतील भागातील माती, ढिगारे व इतर अवशेष हटविण्याचे काम सुरू असून मूळ बांधकामातील निखळलेले दगड काळजीपूर्वक क्रमांकित (नंबरिंग) करण्यात येत आहेत. पुढील टप्प्यात याच मूळ दगडांच्या आधारे वास्तुशास्त्रीय पद्धतीने कोठारांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. माती हटवल्यानंतर कोठारामध्ये शिवकालीन फरसबंदीचे अवशेषही उघडकीस आले असून, या वास्तूंचे मूळ स्वरूप आणि वापर अधिक स्पष्ट होत आहे.
