भारतीय मजदूर संघाची मागणी
| चिरनेर | प्रतिनिधी |
राज्य सरकारने कामगारांसाठी जारी केलेल्या 12 तास कामाच्या परिपत्रकाचा भारतीय मजदूर संघाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. याबाबत राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची भेट घेत हा निर्णय मागे घेण्याची मागणी मजदूर संघाने केली आहे.
या निर्णयामुळे कामगारवर्गावर अन्याय होणार असून, त्याचे गंभीर परिणाम होतील. यातून आठ तास काम व 48 तास आठवड्याची मर्यादा हा कामगारांच्या कायद्यातील मूलभूत हक्क हिरावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगार मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात 12 तास कामकाजामुळे कोणते परिणाम होतील यावर काही मुद्दे मांडण्यात आले आहेत. देशात बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा असताना, अशा प्रकारे कामाचे तास वाढविल्यास किंवा एका व्यक्तीकडून अधिक काम करून घेतल्यास, कामाचा दर्जा कमी आणि रोजगाराच्या संधीही कमी होतील. कामगारांवर कामाचं ताण आणि दबाव वाढेल. यामुळे कारखानदार व ठेकेदारांकडून होणारे शोषण वाढेल. दीर्घकाळ काम केल्यामुळे शारीरिक, मानसिक थकवा अपघातांचे प्रमाण, आजार व अकाली मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण होईल. कामाचे तास वाढले तर महिलांना दीर्घ वेळ काम करणे अत्यंत कठीण जाणार आहे. तसेच कुटुंब, मुले आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांची तारांबळ होणार असून, परिस्थिती अधिक बिकट होईल. यातून कुटुंबाला वेळ देता न येणे, मुलांच्या शिक्षणावर परिणाम, सामाजिक जीवन धोक्यात येईल, असेही मुद्दे मांडण्यात आले.
या भेटीत भारतीय मजदूर संघाच्यावतीने प्रदेशातील प्रमुख पदाधिकारी, विविध जिल्ह्यांतील कामगार संघटनांचे नेते व संबंधित औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपले मत मांडले. कामगारांचे हक्क, रोजगाराची हमी आणि कुटुंबीयांचे आरोग्य यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील.
सुरेश पाटील,
राष्ट्रीय सचिव, बीएमएस







