उरणमध्ये भात कापणीला सुरुवात

| चिरनेर । वार्ताहर ।

प्रतिवर्षी भात कापणी सुरू असतानाच अवेळी पाऊस आपला रंग दाखवतो, यामुळे उभ्या भातपिकांवर पाणी फिरते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी उरण तालुक्यात शेतकर्‍यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. तालुक्यातील बहुतांशी भागात भात कापणीला वेग आलेला दिसून येत आहे. तालुक्याला सुरुवातीपासूनच पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. यंदाच्या वर्षी दोन वेळा तालुक्याला पुराचा चांगलाच फटका बसला. अनेक शेतकर्‍यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. काही प्रमाणात लागवड झालेली शेती या पुराच्या पाण्यामुळे धुपून गेली. तालुक्यामध्ये 40 टक्के शेती ही हळव्या भातांची केली जाते.

पावसामुळे अनेक शेतकर्‍यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तयार झालेले भात पीक जमीनदोस्त झाली. अनेक शेतकर्‍यांनी आहे त्या भाताची कापणी सुरू केली आहे. मात्र पुन्हा अवेळी पावसाच्या भीतीने शेतकरीवर्ग चिंतेमध्ये आहे.

10 ते 12 दिवसांच्या या पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकर्‍यांची मोठ्या जोराने हळवी भाताची शेती कापणीस जरी सुरुवात केली असली तरी आजही या शेतकर्‍यांसमोर अवेळी पावसाच्या भीती व्यतिरिक्त शेतीमध्ये आजही तुंबलेले पाणी, कापणीनंतर भात सुकवणीचा प्रश्‍न तसेच मजुरांचा प्रश्‍न कायम आहेत. सध्या शेतकरी भात पीक येवून देखील पुन्हा पावसामुळे अडचणीतच आहे. तालुक्याच्या अनेक ठिकाणी भात कापणी सुरू आहे. शेतातील पाण्याचा विचार न करता शेतीची कापणी करून शेताच्या बांधावर कापलेले भात सुकवण्याचे काम सुरू आहे. तर मिळेल ते मजूर तर मिळेल त्या वाहनांनी कापलेला भात शेतकरी घरी नेण्यात मग्न आहेत. काही ठिकाणी आजही शेतामध्ये एवढे पाणी आहे की कापणी करू शकत नाही, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी कापलेले भात पीक सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version