उखारु भात शेतीतील भात लावणीची कामे रखडली
| श्रीवर्धन | वार्ताहर |
यावर्षी पावसाला लवकरच सुरुवात झाली. हवामान खात्याने हा पाऊस अवकाळी असल्याचे जाहीर केले होते. परंतु, प्रत्यक्षात पाहता हा पाऊस मोसमी पाऊसच सुरू झाला होता. कारण त्यावेळी समुद्राचे पाणी देखील खवळलेले होते व जोरदार वारे देखील सुटत होते. सुरुवातीच्या पावसाचे हेच लक्षण असते. विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट होणे, म्हणजे पहिला पाऊस सुरू झाला असे मानले जाते. सुरुवातीला श्रीवर्धन तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाण्याची पातळी वाढली. तर नद्या नाले देखील दुथडी भरुन वाहू लागले.
पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे स्वाभाविक शेतकऱ्यांनी आपली भात पेरणी देखील या वेळेला लवकर केली. आता भात लावणी योग्य झालेले असून अनेक उखारु शेतांमध्ये पाणी नसल्यामुळे लावणीची कामे रखडलेली आहेत. तर पाणथळ शेतांमध्ये देखील पाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. उखारु शेतीची भात लावणी करण्यासाठी जोरदार पाऊस सुरू असावा लागतो व ओढ्याचे येणारे पाणी शेतात आल्यानंतर त्यामध्ये चिखल तयार होतो व भाताची लावणी करता येते. मागील महिन्याभरापासून श्रीवर्धन समुद्रकिनारी जोरदार वारे सुटत असून पावसाचे आलेले ढग पुढे सरकतात.
श्रीवर्धनपासून दहा ते पंधरा किलोमीटर लांब म्हसळ्याच्या जवळ गेल्यानंतर पाऊस पडताना दिसतो. परंतु श्रीवर्धन कोरडेच असते. आता सुद्धा दिवसातून दहा मिनिटं एखाद पावसाची सर कोसळते व एरवी लख्ख सूर्यप्रकाश पडलेला असतो. जर येत्या पाच-सहा दिवसात जोरदार पाऊस झाला नाही तर भात शेतीची लावणी न झाल्याने भाताची रोपे खूप मोठी होतील. उशिरा लावणी झाल्यानंतर सदरची पिके वाढण्यासाठी खूप उशीर देखील होतो. एकूणच पावसाने दडी मारल्यामुळे या ठिकाणचा शेतकरी चिंतातूर झाल्याचे पाहायला मिळत आहे.