शेतकर्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
। नेरळ । प्रतिनिधी ।
भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्या रायगड जिल्ह्यात शेतकर्यांच्या भाताची शासनाच्या आधारभूत पद्धतीने खरेदी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. भाताची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शासनाने मान्य केली आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात विविध 40 ठिकाणी भाताची हमी भावाने खरेदी केली जाणार असून 30 नोव्हेंबर पर्यंत भाताची ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी हमी भावाने भाताची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील 40 ठिकाणी खरेदी केंद्रे सुरु करण्यात येणार असल्याचा अद्ययादेश काढला आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात सहा ठिकाणी, पेण तालुक्यात सहा ठिकाणी, कर्जत तालुक्यात पाच ठिकाणी, रोहा तालुक्यात चार ठिकाणी तर पोलादपूर तालुक्यात दोन आणि म्हसळा, पनवेल, खालापूर, श्रीवर्धन, माणगाव, महाड या तालुक्यात प्रत्येकी एका ठिकाणी भाताची हमी भावाने खरेदी केली जाणार आहे. त्याचवेळी जिल्ह्यात गोदामे उपलब्ध असलेल्या सहा ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून सब एजंट नेमण्यात आले आहेत. त्यात पेण आणि माणगावमध्ये प्रत्येकी एक आणि सुधागड तालुक्यात चार ठिकाणी हमी भावाने खरेदी केली जाणार आहे.