चिरनेरमध्ये भात मळणीला सुरुवात

। जेएनपीटी । वार्ताहर ।
बेभरवशी हवामानामुळे शेतीची हमी राहिली नसली तरी चिरनेरमधील एका शेतकरी पठ्ठ्याने पावसाळा संपायच्या अगोदरच आपले पीक तयार करून त्याची मळणीदेखील केली आहे. काशिनाथ खारपाटील असे या शेतकर्‍याचे नाव आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला भातपीक तयार होते. मात्र, या शेतकर्‍याचे सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच पीक तयार झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या शेतकर्‍याने दफ्तरी हे संकरीत भाताचे बियाणे पेरले होते. साधारणपणे 90 दिवसांत हे पीक तयार होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला हे पीक तयार होईल, असे बियाणे विक्रेत्याने त्यांना सांगितले होते. मात्र, पावसाळा सुरू असतानाच अपेक्षा नसताना हे पीक लवकरच तयार झाले. सध्या सतत पाऊस पडत असल्याने तयार झालेल्या पीक कापून त्याची मळणी कशी करायची, असा गहन प्रश्‍न या शेतकर्‍याच्या समोर उभा होता. मात्र, हातातोंडाशी आलेले पीक हातून जाऊ नये यासाठी या शेतकर्‍याने पावसाची थोडीशी उसंत मिळताच कापून झोडणी केली. एकीकडे बाजूची शेती हिरवीगार असताना आणि पिकात गरवा भरणे सुरू असताना एवढ्या लवकर झालेल्या पिकाबद्दल गावातील शेतकर्‍यांनी आणि कृषी अधिकार्‍यांनीदेखील आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

Exit mobile version