रिक्षा प्रतिनिधींसह शेकापच्यावतीने निवेदन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आरटीओ विभागाची मान्यता नसताना अलिबागमध्ये बेकायदेशीरपणे रेंट बाईकचा धंदा राजरोसपणे चालविला जात आहे. या धंद्यामुळे रिक्षा चालक-मालकांच्या उपजीविकेवर गदा येऊ लागली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाले आहे. शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह रिक्षा चालक-मालकांनी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच पोलीस निरीक्षक साळे यांची भेट घेऊन प्रश्न मांडला. तसेच, अनधिकृत रेंटल बाईकवर तातडीने कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा रिक्षाचालक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
रिक्षाचालकांच्या मते, शहरात केवळ दोन परवानाधारकांना दहा ते बारा बाईक ठेवण्याची मुभा आहे. मात्र, प्रत्यक्षात हेच परवानाधारक 40 ते 50 बाईक रस्त्यावर सोडत आहेत. तसेच, इतर अनेकजण कोणतेही परवाने न घेता रेंटल बाईकचा बेकायदेशीर धंदा सुरू ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे 500 ते 600 परवानाधारक रिक्षाचालकांचा रोजीरोटीचा प्रश्न ऐन पर्यटन हंगामात गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या सर्व प्रकारामुळे अलिबागच्या रिक्षा व्यवसायावर गंभीर संकट ओढावले असून, अनेक चालक कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा तथा शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे व शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालक प्रतिनिधी मंडळाने गुरुवारी (दि.25) अधीक्षक आंचल दलाल तसेच अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांना दिले. यावेळी अलिबाग ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी अफजल सय्यद, अमीन मुल्ला, पप्पू पडावे, शरद राऊत, स्वप्नील नाईक, मन्सूर आगा आणि संदीप म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
ठोस पावले उचलावीः ॲड. मानसी म्हात्रे
गेल्या सहा महिन्यांत अलिबागमध्ये अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रिक्षा चालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. स्थानिकांच्या या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी शेकापच्या ॲड. मानसी म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. पेण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची सोमवारी भेट घेऊन बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांसह स्थानिकांची ने-आण करणाऱ्या 1 हजार 200 रिक्षा चालकांचे कुटूंब त्यांच्या मिळकतीवर अवलंबून आहे. हा अवैध व्यवसाय पोटावर पाय देणारा ठरला आहे. या गंभीर समस्येवर तातडीने शासकीय यंत्रणेने ठोस पावले उचलावी, अशी मागणी मानसी म्हात्रे यांनी केली.
रेंट बाईकमुळे स्थानिक रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. कर्ज काढून रिक्षा घेण्यात आल्या आहेत. रिक्षा व्यवसायातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविला जात आहे. त्यामुळे रेंट बाईकचा अनाधिकृत व्यवसाय बंद व्हावा, अशी मागणी असून संबंधितांविरोधात कारवाई करावी.
रिक्षा चालक, अलिबाग







