रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; सोन्याचे मंगळसूत्र केले पोलीस ठाण्यात जमा

। पनवेल । प्रतिनिधी ।
चिंचपाडा गावात राहणार्‍या एका रिक्षाचालकाने महिलेची प्रवासादरम्यान रिक्षामध्ये पडलेले सोन्याचे मंगळसूत्र पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.6) जमा करून प्रामाणिकपणाची प्रचीती दिली आहे. मात्र कुठल्या महिलेचे मंगळसूत्र रिक्षामध्ये हरविले असल्यास त्या महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पनवेल तालुक्यातील चिंचपाडा गावातील रहिवासी व आता स्थलांतरित झालेल्या पुष्पक नोड वडघर येथे राहणारे मंगेश लहू भिंगारकर असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव असून रिक्षा नंबर एमएच 46 एसी 3297 अशी रिक्षा मंगेश हे चालवत आहे. मंगेश यांच्या रिक्षामधून प्रवासीला सोडल्यानंतर रिक्षामध्ये पडलेले अज्ञात महिलेचे मंगळसूत्र परत करत अनेक मुजोरी करणार्‍या रिक्षा चालकांना चांगल्या कामाची प्रचीती करून दिली आहे. हि घटना चार दिवसापूर्वी घडली आहे. त्याने ती वस्तू घेत प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष नरेश परदेशी यांची भेट घेत याबाबत माहिती दिली.


अखेर गुरुवारी यांनी पनवेल शहर गाठत याबाबतची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जोशी यांना दिली व हे सोन्याचे मंगळसूत्र पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेट्टे यांच्याकडे जमा केले. पोलिसांनी या प्रामाणिक रिक्षाचालकाचे कौतुक केले.

Exit mobile version