रायगडातील रिक्षाचालकांना मीटर बदलाचा फटका

| पेण | प्रतिनिधी |

मुंबईप्रमाणेच एमएमआरडीए क्षेत्रातील अलिबाग आणि पेण तालुक्यातील अ‍ॅटो रिक्षाचालकांना आता मीटरमध्ये बदल करणे आवश्यक बनले आहे. ते बदल करताना रिक्षाचालकांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबईच्या रिक्षावाल्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये संप पुकारला होता. त्यावेळी संप मिटवण्यासाठी रिक्षांचे भाडे वाढ करण्याचे ठरले. त्याच वेळी एमएमआरडीए कडून मीटर नव्याने अपडेट करण्याचे ठरले. पूर्वीचे भाडे कमीतकमी दीड किमीला 21 रुपये असे आकारले जात होते. परंतु भाडेवाढीमुळे ते 23 रूपये झाले. त्यामुळे मीटरमध्ये नव्याने बदल करून अपडेट करणे क्रमप्राप्त झाले. हे केवळ मुंबईमध्ये लागू न होता एमएमआरडीए क्षेत्रामध्ये लागू झाले. त्यामुळे रायगडातील पेण व अलिबाग ही दोन्ही तालुक्यातील रिक्षाचालकांना आता आपल्या मीटरमध्ये आवश्यक ते बदल करुन घेणे क्रमप्राप्त झालेले आहे.

पेण आणि अलिबाग या दोन्ही तालुक्यामध्ये मीटरनुसार भाडे आकारत नाहीत हे ही सत्य होते. तरी देखील पेण आणि अलिबाग येथील रिक्षा चालकांना आपल्या रिक्षाना मीटर बसवणे बंधनकारक झाले. आज या मीटरची किंमत पाहिली तर 1700 पासून 2500 रूपया पर्यंत आहे. त्यातच 950 रूपये हे एम.एम.आर.डी.ए. च्या आदेशाने उपप्रादेशिक परिवहन खात्याकडून दंड स्वरूप वसूल केले जात आहेत. मुंबईच्या रिक्षावाल्यांनी आपल्या रिक्षाचे मीटर अपडेट करून घेतले. मात्र रायगड मधील रिक्षावाल्यांचे मीटर अपडेट न झाल्याने त्यांना नव्याने मीटर बसवणे क्रमप्राप्त झाले. आज प्रत्येक रिक्षावाल्याला साधारणतः 2,050 रूपये मीटरसाठी खर्च करावे लागत आहेत. 950 रुपये दंड आणि मीटर झटपट पास व्हावा म्हणून 150 रूपये असे एकूण 3,150 रूपये खर्च पेण आणि अलिबागच्या रिक्षावाल्यांना करावा लागत आहे.

मीटर पास करण्यासाठी जास्तीचे 150 रुपये जे घेतले जातात. त्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांना विचारणा करण्यासाठी कार्यालयात आमचा प्रतिनिधी पोहोचले असता त्यांच्या केबिनला कुलुप होते. तेव्हा घडयाळात 11 वाजून 17 मिनिटे झाली होती. त्यांच्या मोबाईल वर संपर्क केला असता तो संपर्क होत नव्हता. तेव्हा तेथील अधिकार्‍यांनी सांगितले की, साहेब ऑन द वे आहेत एवढयात पोहोचतील तस पाहता महेश देवकाते हे कार्यालयापासून दोन ते अडीच किलोमीटर असलेल्या अंबेघर येथे राहतात. परंतू, कार्यालयात वेळेवर नव्हते मात्र, साधारणतः बारा वाजून सव्वीस मिनीटांनी देवकाते यांना भ्रमंती ध्वनीवर संपर्क झाला तेव्हा त्यांनी सांगितले की, बायपासला गाडया पासिंगच्या ऑनलाईन बुकींग संर्दभात उभा असून ग्राहकांचे गैरसमज दूर करत आहे. त्यावेळी त्यांना जास्तीचे दीडशे रुपये घेण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी अशा प्रकारचे जास्तीचे पैसे आमच्या कार्यालयात घेतले जात नाहीत. तरी त्याबाबत सखोल चौकशी करतो. कुणी घेत असतील तर त्यांच्या विरुध्द कारवाई केली जाईल.

रायगड मधील पेण आणि अलिबाग मध्ये एकूण 3,803 इतक्या रिक्षा आहेत तर उर्वरित मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, रोहा, महाड, पोलादपूर, सुधागड या तालुक्यांमध्ये 5,700 रिक्षा आहेत. अशा एकूण रायगड जिल्हयामध्ये 9,503 रिक्षा असून यामधील 3,803 रिक्षांना 3,150 रूपये खर्च येणार असून जर एका रिक्षा मागे 150 रुपये जास्त घेत असतील तर, जवळपास 5 लाख 70 हजार 450 रुपये कुणाच्या खिशात जातील? याची ही चौकशी होणे गरजेचे आहे.

Exit mobile version