पनवेल आरटीओ कार्यालयाबाहेर तीन किलोमीटरपर्यंत रांगा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नव्या दराप्रमाणे दर आकरणी करण्यासाठी ऑटो रिक्षाचे मीटर रीकॅलिब्रेशन (मीटर बदल) करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेली मुदत निघून गेल्याने मीटर रीकॅलिब्रेशन न करून घेतलेल्या रिक्षा चालकांना दर दिवशी 50 रुपये दंड आकरण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या या निर्णयचा फटका बसू नये याकरिता मीटर रीकॅलिब्रेशन करून घेण्यासाठी रिक्षा चालकांची मोठी गर्दी पनवेल उप प्रादेशिक विभागाच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीमधील कार्यालयाबाहेर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, सोमवारी (ता.23) कार्यालयाबाहेर जवळपास तीन किलोमीटरपर्यंत ही रांग लागल्याचे पाहायला मिळाले.
इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे रिक्षा भाडेवाढ करण्यास परवानगी देण्याची मागणी रिक्षा चालकांच्या संघटनानाकडून करण्यात आली होती. संघटनांच्या मागणीची दखल घेत ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत दीड किलोमीटर प्रवासासाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये दर आकरण्यास प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिली होती. यावेळी नव्या दराप्रमाणे ऑटो रिक्षा चालकांनी आपले मीटर रीकॅलिब्रेशन करून घ्यावेत, असे आदेश देण्यात आले होते. याकरिता रिक्षा चालकांना 15 जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली होती. सात दिवसांपूर्वी ही मुदत पूर्ण झाली होती. मुदत पूर्ण होऊनही रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षामधील मीटरचे रीकॅलिब्रेशन करून घेतले नसल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने मुदतीनंतर दर दिवस 50 रुपये दंड अथवा तेवढ्या दिवसांपर्यंत परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याने भंबेरी उडालेल्या रिक्षाचालकांनी दंडापासून वाचण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागांतर्गत जवळपास 26 हजार 628 रिक्षा परवानाधारक आहेत. परिवहन विभागाने दिलेल्या मुदतीत आतापर्यंत जवळपास आठ हजार रिक्षाचालकांनीच आपले रिक्षामधील मीटर रीकॅलिब्रेशन केले आहे.
आरटीओ अधिकारी