। खोपोली । वार्ताहर ।
दहीहंडी कार्यक्रमात फुगे, खेळणी विक्रीसाठी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या विके्रेत्यांच्या टेम्पोला खंडाळा घाटात अपघात झाला. गुरूवारी (दि.18) सायंकाळी 6.30 च्या दरम्यान ही घटना घडली. रिक्षा टेम्पोत लहान मुलांसह गर्भवती महिलाही प्रवास करीत होती. यामध्ये प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
आठवडा बाजार, जत्रा अशा कार्यक्रमात खेळणी, फुगे विकूण पोटाची खेळगी भरणारे काळे कुटुंब मुंबईत दहीहंडी कार्यक्रमात फुगे, खेळणी विक्रीसाठी पुण्याहून रिक्षा टेम्पोमधून जात होते. घाटातील सायमाळजवळ आले असता त्यांचा टेम्पो पलटी झाला. यामध्ये चालक दिनेश वाघेला याच्यासह भारत हिरा चव्हाण, शिवा काळे, मंगल शिवा काळे, लक्ष्मी काळे, रेणुका काळे, सुनीता काळे, राधा अर्जुन पवार, गौरी काळे (वय 1) हे किरकोळ जखमी झाले.
सर्पमित्र सुनिल पुरी, नवीन मोरे, मनोहर म्हात्रे, निलेश कुदळे यांनी तात्काळ मदत करीत संदीप मजेठीया यांच्या कारमधून जखमींना आंबेडकर रूग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमी असल्यामुळे प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना सोडण्यात आले.