सहाण येथे सावित्रीच्या लेकी सायकलवर स्वार

सीएफटीआयच्या माध्यमातून 163 विद्यार्थिनींना मोफत सायकल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या अभियानांतर्गत सिएफटीआयच्या माध्यमातून सहाण, ता.अलिबाग येथील 163 शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप शुक्रवारी ( 23 डिसेंबर) केले. यावेळी सिएफटीआयच्या विश्वस्त चित्रलेखा पाटील, अ‍ॅटलस कॉपकोच्या होल्डींग कंट्रोलर तथा सीएफओ साची जोशी, सीएसआर प्रमुख अभिजीत पाटील, सीएफटीआयचे विश्‍वस्त शुभंकर टकले, सिद्धेश बागवे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल पाटील, रेश्मा सेजपाल, साम्या कोरडे आदी उपस्थित होते.

गणेशकृपा हॉल, सहाण येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अलिबाग तालुका रामराज विभागातील नवघर, ताजपुर, रामराज, बापले, फणसापूर, भोनंग, महान, मोरोंडे, दिवीपारंगी, बेलोशी, सहाण, सहाणगोठी, ढवर आदी गावातील 163 शालेय विद्यार्थींनींना सायकलींचे वाटप सीएफटीआयच्या माध्यमातून केले.

प्रास्तविक करताना सीएफटीआयच्या विश्‍वस्त चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, आपल्या समोर सध्या चार प्रश्‍न सर्वात मोठे आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणी आणि निवारा. या प्रश्‍नांसाठी आपण काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सीएफटीआयच्या माध्यमातून आपण तळागाळातल्या लोकांपर्यंत विविध प्रकारची मदत, योजना पोहचविण्याा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. शाळा गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी सायकल वाटप अभियान उपयोगी ठरत आहे. त्याचप्रमाणे त्यातून आरोग्य देखील सुधारत आहे. यासाठी अनेक कार्यकत्यांचे सहकार्य लाभत आहे. आजही अविकसीत पट्टयात अनेक योजना राबविण्याची गरज आहे. सरकारच्या घरकुल योजना असल्या तरी त्याला विशेष घटकांच्या मर्यादा आहेत. अनेक आर्थिक मागासवर्गींयांसाठी घरकुल योजना राबविण्याची गरज आहे. त्याप्रमाणे पाण्याची समस्या देखील आहेत यासाठी अ‍ॅटलस कॉपकोसारख्या उद्योगांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केली.

अ‍ॅटलस कॉपकोच्या होल्डींग कंट्रोलर तथा सीएफओ साची जोशी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना तळागाळातल्या जनतेपर्यंत योजना पोहचवण्यासाठी सीएफटीआय हे एक चांगले माध्यम आहे. सायकल वाटपातून शिक्षणाला चांगला हातभार लागू शकतो. त्याचा विद्यार्थींनीनी चांगला लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. तुम्ही तुमची स्वप्ने या माध्यमातून पुर्ण करुन तुम्हाला हवे ते बनु शकता यासाठी शाळा देखील मदत करेल असा विश्‍वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. सीएसआर प्रमुख अभिजीत पाटील म्हणाले की, महिला अधिकारी चांगला प्रभाव पाडु शकतात. यासाठी विद्यार्थीनींनी चांगले परिश्रम घेण्याची गरज आहे. आपण इतरांपेक्षा कमी नाही ही खुणगाठ मनाशी बांधून खूप मोठया पदापर्यंत तुम्हालाही पोहचता येईल हे लक्षात ठेवा. अडचणींवर मात करा. सायकल वाटपामुळे आयुष्यात गतिमानता येईल आणि पुढे जायला प्रेरणा मिळेल असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचलन सिएफटीआयचे सीओओ अमित देशपांडे यांनी केले.

Exit mobile version