अलिबाग समुद्रकिनारी वस्तू विक्री व प्रदर्शन
| अलिबाग | प्रतिनिधी |
भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद आयोजित, टाटा कम्युनिकेशन्स लि. मुंबई पुरस्कृत उदया प्रकल्पांतर्गत प्रशिक्षित महिला उद्योजकांसाठी तीन दिवसीय वस्तू विक्री व प्रदर्शनाच्या आयोजनातून हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात आले आहे. शनिवारी त्याचा शुभारंभ अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांताप्पा हरळय्या, उदया प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश सोळंकी, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप अपसुंदे, प्रकल्प अधिकारी शशिकांत धनोरीकर, प्रशांत वाघमारे, मोहन पालकर आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील महिला उद्योजिका उपस्थित होते.
अलिबाग समुद्रकिनारी फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना एकाच ठिकाणी खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सव 25 डिसेंबरपर्यंत सुरु करण्यात आला आहे. या महोत्सवात अलिबागपासून पनवेल, उरण, रोहा, पेण, माणगाव अशा अनेक तालुक्यांतील स्टॉल उभारण्यात आले आहेत. महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू, खाद्य पदार्थांचा आनंद या उपक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे. त्यामध्ये नाचणी लाडू, वेगवेगळ्या प्रकारचे छायाचित्र, ड्रेस मटेरिअल, फरसाण, ज्वेलरी आदी घरगुती व भेटवस्तूंचा समावेश आहे. या महोत्सवात सुमारे 50 स्टॉल्स आहेत. या महोत्सवात पेणच्या सुबक आकारातील गणेशमूर्तीदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात वेगवेगळ्या आकाराच्या मूर्तींचा समावेश आहे.
छायाचित्रांचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून आहे. उदया प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शनामुळे आमच्या व्यवसायाला चालना मिळत आहे. रोजगाराची संधी मिळत आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्याचा हा प्रयत्न खऱ्या अर्थाने आम्हाला एक उभारी देणारा आहे.
सुचिता तारेश नाईक, अलिबाग







