आयसीसीकडून नियम रद्द

अखेर ‘सॉफ्ट सिग्नल’ला गुडबाय; वल्डॅ टेस्ट चॅम्पियनशिपपासून होणार अंमलबजावणी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

क्रिकेटमध्ये सॉफ्ट सिग्नलचा नियम अखेर संपणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, हा नियम 7 जूनपासून होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून हद्दपार होणार आहे. दरम्यान, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये हा सामना होणार आहे.

‘क्रिकबझ’च्या हवाल्यानं ही बातमी समोर आली आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष असताना या निर्णयाला सौरव गांगुली यांनी मान्यता दिल्याचं बोललं जात आहे. तसेच, सॉफ्ट सिग्नल समाप्त करण्याच्या निर्णयाची माहिती डब्ल्यूटीसी फायनल खेळणार्‍या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना देण्यात आली आहे. तसेच, क्रिकबझनं असंही म्हटलं आहे की, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जर मैदानातील नैसर्गिक प्रकाशाची स्थिती खराब असेल, तर फ्लडलाईट्स चालू करता आले असते. दरम्यान, या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

नियम नक्की काय आहे?
आयसीसीच्या नियमांनुसार, सॉफ्ट सिग्नल ही अशी परिस्थिती आहे जिथे मैदानी पंच झेल किंवा अन्य निर्णयासाठी तिसर्‍या पंचाकडे जातात. सर्व व्हिडीओ आणि कॅमेरा अँगल बघूनही तिसर्‍या पंचाचे समाधान होत नाही, त्यावेळीस मग ते मैदानावरील पंचाचे मत घेतात. जर मैदानी पंचाने प्रथम फलंदाजाला बाद घोषित केले असेल, तर मैदानी पंचाचा ‘सॉफ्ट सिग्नल’ निर्णय मानला जातो.

गतवर्षी इंग्लंडला फायदा
दरम्यान, या नियमामुळे इंग्ल्ंडच्या कसोटी संघाचा कर्णधार स्टोक्सच्या संघाला गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात फायदा झाला होता. पाकिस्तानचा फलंदाज सौद शकीलला पंचांनी सॉफ्ट सिग्नल म्हणून आऊट दिले होते.

Exit mobile version