छ. संभाजीनगरमध्ये दोन गटात दंगल; गाड्यांची जाळपोळ

| संभाजीनगर | प्रतिनिधी |

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. यामध्ये एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जमावाने रात्री पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. शहरातील किराडपुरा भागात ही दंगल झाली. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये आधी बाचाबाची झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली. पुढे जाळपोळ आणि हाणामारी सुरूच होती. अफवांवर विश्‍वास ठेवू नका असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी किराडपुरात भागात मोठा बंदोबस्त केला आहे. नागरिकांना शांतता राखण्याचं आणि अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच संभाजीनगरातील सर्वपक्षीय नेत्यांनी देखील नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. संपूर्ण परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

चारशे जणांवर कारवाई
याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिनसी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी 15 गाड्यांचे नुकासन केले आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगा भडकवणे आदी कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपास करण्यासाठी 8 पथके तयार करण्यात आले आहेत.

संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु काही लोकं याठिकाणी भडकाऊ प्रतिक्रिया देत असून, परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत.

देेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
Exit mobile version