ऋषभ पंतच्या प्रकृतीत सुधारणा

| नवी दिल्ली | प्रतिनिधी |

कार अपघातात गंभीर जखमी झालेला यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून, त्याला उपचारासाठी अन्यत्र हलवायचे की नाही याचा अजून निर्णय झाला नसल्याचे पंतच्या कुटुंबीयांनी सांगितले. डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात पंतवर उपचार सुरू असून, आई सरोज पंत आणि लंडनहून तातडीने आलेली बहीण साक्षी त्याच्या जवळ आहेत. दिल्ली संघातील खेळाडू नितीश राणा, अभिनेते अनिल कपूर, अनुपम खेर यांच्यासह दिल्ली क्रिकेट संघटनेचे संचालक श्याम शर्मा यांनी शनिवारी रुग्णालयात पंतची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

पंतवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळही रुग्णालयाच्या सतत संपर्कात आहे. सध्या तरी पंतवर येथेच उपचार होणार असल्याचे श्याम शर्मा यांनी सांगितले. पंतच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा असून, शुक्रवारीच त्याच्या कपाळावर प्लॅस्टिर सर्जरी करण्यात आली आहे. सध्या तरी त्याला अन्यत्र हलविण्याचा विचार नाही, असे पंतवर उपचार करणारे डॉक्टर उमेश कुमार यांनी सांगितले.

Exit mobile version