घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना झटका

। मुंबई । वृत्तसंस्था ।
वाढत्या महागाईने सर्वसामान्य होरपळले असतानाच, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्यानं त्रासात भर पडली आहे. रशियातून कमी दराचे कच्चे तेल आयात केल्यानंतर आता गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत वाढत असताना, केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांनी रशियासोबत करार करून तीन दशलक्ष बॅरल कच्चे तेल अतिशय माफक दरात आयात केले. या आयातीमुळे अमेरिकेने टाकलेल्या आर्थिक निर्बंधांचे कुठेही उल्लंघन झाले नाही. असे असताना सुद्धा आता कच्च्या तेलाच्या वाढीव किंमतीचा दाखला देऊन घरगुती गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकारला केला आहे.

ज्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत न्यूनतम होती, तेव्हा देखील मोदी सरकारने स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी केले नाहीत आणि आता वाढीव किंमत आहे, असे सांगून मोदी सरकार घरगुती गॅस व इतर इंधन दरवाढ करत आहे, हे योग्य नाही, असेही तपासे म्हणाले. भारतात महागाईने आठ महिन्यांत उच्चांक गाठलेला आहे. अशा परिस्थितीत घरगुती गॅस दरवाढीमुळे सामान्यांच्या डोक्यावर अधिक आर्थिक बोजा पडेल, अशी शंकाही महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version