इंधन दरवाढीने वाहतुकीचे प्रमाण घटले

मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा
मुंबई | प्रतिनिधी |
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल, डिझेलचे दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.इंधन दरवाढीने वाहतुकीचे प्रमाण घसरल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतोय हे केंद्राच्याही लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढं वाढलं, डिझेलचे भाव तेवढे झाले. तसं नाहीये. हे आपल्या भल्यासाठीच होतंय, असा चिमटा काढतानाच मी काही बोललो तर टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो असं म्हणता. पण मी खरं की खोटं बोलतो हे तुम्ही सांगा. इंधन परवडेनासं झालं तर तुम्ही म्हणतात तसं प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही? म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांचा टक्का घसरत आहे. त्याबद्दल आपण चिंता व्यक्त केली. सार्वजनिक वाहतूक यामधला प्रवाशांचा टक्का घसरला त्याला दोन कारणं आहेत. गेल्या दीड वर्षातील कोरोनाची परिस्थिती हे एक कारण असेल. दुसरं कारण मीही असेल. मीच लॉकडाऊन लावला होता. टक्का घसरला होता तो कोरोनाने किती घसरला हे थोड्या दिवसाने कळेल, असंही ते म्हणाले.

स्वच्छतेचा कानमंत्र
सगळे मार्ग खड्डे मुक्त असले पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ आणि टापटीप हवी. आपली मेट्रो स्टेशन अप्रतिम आहेत. मी ही स्टेशनं पाहिल्यानंतर माझाही त्यावर विश्‍वास बसला नाही. अशा मेट्रो आल्यातर मेट्रो, बस, लोकलमधून कुणालाही प्रवास करायला आवडेल, असंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version