। सुधागड -पाली । वार्ताहर ।
जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. परिणामी उष्मा प्रचंड वाढल्याने सर्वच बाजारपेठांमध्ये दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत शुकशुकाट पहायला मिळत आहे. फिरते व रस्त्याच्या कडेला बसणार्या विक्रेत्यांना उन्हाचा सर्वाधिक फटका बसत आहे. उष्णतेचा विक्रमी पारा चढलेला असल्याने पाली परिसर काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या काहिलीचा मोठा फटका बाजार पेठेला बसला आहे. या बाजारात महिनाभरापासून ग्राहकच फिरकत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांना हातावर हात ठेवून बसावे लागत आहे.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या दिवसांत कडधान्य, सुकी मासळी आदी अगोटीच्या खरेदीची लगबग पाहायला मिळते. शिवाय शेतकरी बी-बियाणे, खते आदींच्या खरेदीला लागतात. ताडपत्री व इतर सामानाची देखील खरेदी केली जाते. मात्र सध्या प्रचंड उष्मा असल्याने या खरेदीसाठी कोणी बाहेर पडतांना दिसत नाही. याचा येथील व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. मालाला उठाव नाही. त्यामुळे अनेकांचे नुकसान होत आहे. असे पाली व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत खैरे यांनी सांगितले. ग्राहकांअभावी विक्रेत्यांच्या मालाला उठाव नाही त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. तसेच विक्रीसाठी आणलेला मालही लवकर खराब होतो. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.
रस्त्यावरील विक्रेत्यांचे हाल
अनेक आदिवासी महिला गावठी भाज्या, कैर्या, आंबे, काजूगर, कोकम, जाम, करवंद आदी रानमेवा विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला बसतात. मात्र येथे कित्येक तास त्यांना उन्हात बसावे लागते. लांब गावावरून येत असल्याने शहरात किंवा बाजर ठिकाणी त्यांना कोणतीच सोय नसते. शिवाय वाढत्या उन्हामुळे ग्राहक बाहेर पडत नसल्याने मालाची विक्री देखील होत नाही. – लक्ष्मी पवार, रानमेवा विक्रेत्या महिला







