| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेल्या तापमानामुळे आंबा व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हिवाळा संपताच अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे आंब्याचा मोहोर जळणे, फळगळ वाढणे आणि लहान फळे करपून गळणे अशा प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी यंदाच्या हंगामातील उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डिसेंबर-जानेवारीमध्ये थंडीचे प्रमाण समाधानकारक होते. त्यामुळे आंबा बागांमध्ये मोहोर चांगला आला होता आणि बागायतदारांना विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, फेब्रुवारीपासून तापमानात झालेल्या झपाट्याने वाढीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली. अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. या उष्णतेचा थेट परिणाम मोहोरावर आणि नव्याने लागलेल्या फळांवर झाला.
याशिवाय उष्ण हवामानामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. थ्रिप्स, मिलीबग यांसारख्या किडींमुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बागायतदारांना वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे. औषधे, खत, मजुरी, पाणी व्यवस्थापन आणि वीज यासाठीचा खर्च वाढत असताना उत्पादन घटल्याने आर्थिक ताण अधिकच वाढला आहे.
आर्थिक गणित कोलमडले
यंदा चांगल्या दराची अपेक्षा ठेवून अनेक बागायतदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. काहींनी कर्ज काढून बागांची देखभाल केली. मात्र, उत्पादन घटल्यास कर्जफेड करणे कठीण होणार आहे. बाजारात कमी उत्पादन आल्यास दर वाढण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात किती पैसा येईल, याबाबत अनिश्चितता आहे.
सध्याची नुकसानभरपाई अत्यंत अपुरी आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून वास्तव स्थिती पाहावी आणि अधिक व आक्रमक नुकसानभरपाई जाहीर करावी. बागायतदार आधीच कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. वेळेत मदत मिळाली नाही तर अनेकांना गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन आम्हाला दिलासा द्यावा, ही आमची ठाम मागणी आहे.
उत्पादनात मोठी घट होण्याची भीती
आंबा पिकाला फुलोऱ्याच्या व फळधारणेच्या टप्प्यावर मध्यम तापमानाची आवश्यकता असते. मात्र, सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे परागीकरणावर परिणाम झाला असून फळधारणा कमी झाली आहे. काही भागांत 40 ते 50 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे.
यंदा सुरुवातीला मोहोर अतिशय चांगला आला होता. आम्हाला चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. पण अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे संपूर्ण चित्र बदलले. मोहोर जळाला, फळगळ मोठ्या प्रमाणावर झाली आणि उत्पादन अर्ध्यावर आले.
– संकेत हुमणे
बांगणगा कोंडी







