सुरईला दरडीचा वाढता धोका

तहसीलदारांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बघ्याची भूमिका

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

आपत्ती रोखण्याचा गाजावाजा करणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि मुरुडचे तहसीलदार निद्रावस्थेत असल्याचे समोर आले आहे. पावसात मुरुड तालुक्यातील सुरई येथील दत्त टेकडी येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेबाबत महसूल व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे. याच टेकडीवरील उताराच्या भागात धनदांडग्यांनी दगड मातीचा भराव केला असून, त्याचाही धोका असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये दरड कोसळ्याच्या घटना वारंवर घडत आहेत. दरडीखाली चिरडून आतापर्यंत सुमारे 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. पावसाळ्यापूर्वी अनेकवेळा बैठका घेऊन उपाययोजना करण्याचा कागदी घोडा नाचवण्याचे काम या विभागाकडून केल्याचे समोर आले आहे. प्रशिक्षण बैठकांवर वेळ घालवून नागरी सुरक्षेचा दिखावा ही यंत्रणा करीत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. आपत्ती रोखण्यासाठी गावातील मंडळींसह वेगवेगळ्या यंत्रणेची मदत घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ज्या गावात दरड कोसळते, त्या दुर्घटनेची चोवीस तास होऊनदेखील आपत्ती विभागाला माहिती नसणे, ही मोठी शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या सुरई येथील डोंगरावर धनदांडग्यांनी जागा घेऊन बांधकाम केले आहे. त्यांनी दगड मातीचा भराव डोंगराच्या टोकावर टाकला आहे. पावसाळ्यात दगड, माती खाली येऊन जीवितहानी होण्याची भीती आहे. डोंगराच्या टोकापासून शंभर फूट खाली आदिवासीवाड्यांसह गावे आहेत. या ठिकाणी अडीचशेहून अधिक घरे असून, एक हजारहून नागरिक राहात आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली धनदांडग्यांकडून केलेल्या या भरावाबाबत अनेक वेळा स्थानिकांनी तहसीलदार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, प्रत्यक्षात ठोस कार्यवाही करण्यास ही यंत्रणा उदासीन ठरत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. या पावसात सुरई येथील दत्त टेकडीवरील दरड शनिवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. सुदैवाने दगड माती घरांवर कोसळली नाही. प्रशासन सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळत आहे. फक्त बघ्यांची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरड कोसळण्याच्या या घटनेनंतर खालापूर येथील इरसाल वाडीची पुनरावृत्ती होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरड कोसळून 24 तास झाले असताना या घटनेबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दुर्घटना घडल्यावर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहात आहेत.

दत्त टेकडीवरील लहान-मोठ्या दगडांचा धोका निर्माण झाला आहे. माती पावसामुळे भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे शनिवारी माती, दगड खाली कोसळले. पहिल्याच पावसात ही परिस्थिती आहे, तर नंतर काय होणार, याची भीती आहे. त्यामुळे टेकडीवर असलेल्या माती दगडाचा धोका वाढला आहे. घटना घडूनदेखील प्रशासनाकडून उपाययोजनांसाठी कोणतीही हालचाल दिसून आली नाही.

सुरई महिला मंडळ

सुरई येथील दत्त टेकडीवर केलेल्या माती दगडाच्या भरावाची पाहणी मंडळ अधिकारी यांनी केली आहे. ते दगड धोकादायक असल्याचे अहवाल आढळून आले आहे. दगड काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवसात पुढील कार्यवाही केली जाईल. शनिवारी टेकडीवरील दगड माती कोसळली आहे. त्याचा फोटो प्राप्त झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल.

रोहन शिंदे,
तहसीलदार मुरुड
Exit mobile version