। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील लोटे परशुराम येथील रिव्हरसाईड कंपनीसमोर अनेक दिवसांपासून खोदून ठेवलेले गटार धोकादायक ठरत आहे. या गटारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
मागील महिन्यात खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील रिव्हरसाईड या कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जवळपास दहा फूट खोलीचे आणि अंदाजे शंभर फूट लांबीचे गटार औद्योगिक विकास महामंडळाकडून खोदण्यात आले आहे.
सध्या वसाहतीत पाइपलाइनसाठीही संपूर्ण परिसरात खोदाई करण्यात आली आहे. त्याचाही त्रास अनेक वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. महामंडळाच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) या मार्गावरही खोदाई करण्यात आली आहे. मात्र, अनेक दिवसांपासून हे गटार जैसे थेच आहे.
तसेच, या गटाराच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धोक्याची सूचना वा फलक अथवा काम सुरू असल्याची सूचना पट्टी, वेष्टन लावण्यात आलेले नाही. याच मार्गावरील अंतर्गत रस्त्यावरील पथदीप बंदावस्थेत असून या मार्गावरून कामगारांची दिवसरात्र ये-जा सुरू असते. त्याचबरोबर आसपासच्या गावांतील शेतकर्यांच्या जनावरांची वर्दळ असते. कामाच्या ठिकाणी कोणतीही उपाययोजना न केल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.