| पनवेल | वार्ताहर |
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये, वाहनचालकांना कोणत्याही अडचणी उद्भवू नये, यासाठी खारघर परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी काही ठिकाणी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. तर, काही ठिकाणी काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिक तसेच वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खोदकामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्यामुळे काम पूर्ण करण्याची मागणी खारघरवासीयांकडून होत आहे.
पनवेल महापालिकेने लाखो रुपये खर्च करून खारघर परिसरातील मुख्य रस्त्यावर काँक्रीटीकरण सुरू केले आहे. विशेष म्हणजे मे अखेर ही काम पूर्ण होणे आवश्यक असताना जून महिना तसेच पावसाळा सुरु झाला तरीही रस्त्याची कामे पूर्ण झालेली नाहीत. खोदकाम केलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. खारघरचे प्रवेशद्वार असलेल्या हिरानंदानीकडून उत्सव चौकाकडे जाणाऱ्या स्त्यावर वाहनाची वर्दळ असते. मात्र, पालिकेकडून खारघर मुख्य चौकातील एका मार्गिकचे काम अपूर्णच असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. तर बँक ऑफ इंडियाकडून हिरानंदानी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. अशीच अवस्था शिवमंदिरकडून घरकुल आणि डेली बाजाराकडे जाणान्या चेरोबा मंदिर चौकाची झाली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी चार रस्ते आहे. चौकात एका बाजूला काँक्रीटीकरण झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला खोदकाम करण्यात आले आहे. आठ महिन्यांपूर्वी बेलपाड्याकडून भारती विद्यापीठाकडे जाणारा रस्ता, उत्सव चौकाकडून सेंट्रल पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील काम अपूर्णच आहे. तरी अपूर्ण कामे लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी येथील रहिवाशी करीत आहेत.
खारघरमधील खोदकांमामुळे अपघाताचा धोका
