रस्त्यातील मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघाताचा धोका

ठेकेदाराचा मनमानीपणा आणि अधिकारी वर्गाचा कानाडोळा

। धाटाव । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर सुरू असलेल्या मोरी बांधण्याच्या कामाठिकाणी रस्त्यातच मातीचा ढिगारा आहे. याठिकाणी ठेकेदाराकडून कोणत्याच प्रकारची सुरक्षा घेतली गेली नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ठेकेदाराचा मनमानीपणा आणि अधिकारी वर्गाचा कानाडोळा यामुळे याठिकाणी नागरिकांची, वाहनचालकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.

रोहा तालुक्यात धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यावर पावसाळी पाणी साचत असते. या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने काही ठिकाणी वसाहतीतील रस्ते दरवर्षी पाण्याखाली असल्याचे पहावयास मिळते. सध्या रस्त्यावरील मोऱ्याची कामे सुरू असली तरी सबंधित ठेकेदारांनी मात्र येथील नागरिकांची आणि वाहनचालकांची हवी तशी काळजी घेतली नसल्याचे समोर आले आहे. नाक्यानजीक सुदर्शन कंपनीकडे जाणारा उपरस्ता हा खोदून ठेवला असून सर्वत्र मातीचा ढिगारा करून ठेवला आहे. याठिकाणी कामगार, शालेय विद्यार्थी, महिला सायकल तर दुचाकीवरून प्रवास करीत असतात. येथील कामही संथ गतीने सुरू असून याठिकाणी काम सुरू असल्याचे फलक बाजूलाच पण साधे सुरक्षेच्यादृष्टीने पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यासुद्धा लावलेल्या नाहीत. त्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांची हवी तशी काळजी सबंधित ठेकेदाराने घेतली नसून याठिकाणी आओ जाओ घर तुम्हारा अशीच काही अवस्था होऊन बसली आहे.

या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यामुळे रस्ता दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ठेकेदाराचा मनमानीपणा आणि सबंधित अधिकारीसुद्धा याकडे कानाडोळा करीत असल्याचे समोर आले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने कुठलीच तरतूद केली नसल्याने याठिकाणी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र याठिकाणी एखादा अपघात होण्याची ठेकेदार आणि अधिकारी वाट पहात आहेत का? असा सवाल करण्यात येत आहे.

Exit mobile version