निडी येथे ट्रेलर व कार रस्त्याखाली उतरून अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
| नागोठणे । वार्ताहर ।
मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यात आणखी भर म्हणून महामार्गावर नव्याने करण्यात आलेल्या सुमारे एक फुटाहून अधिक उंचीच्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कडेला साईड पट्टीला मातीचा भराव न टाकल्याने चालकांना अंदाज चूकून वाहने रस्त्याच्या कडेला तसेच रस्त्याच्या मध्यभागी खाली उतरत आहेत. अशाचप्रकारे नागोठण्याजवळील निडी येथे रस्त्याला साईड पट्टी नसल्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने ट्रेलर रस्त्यावरुन खाली उतरत एका बाजूला कलंडला तर दोन लेनच्या मध्यभागी मातीचा भराव नसल्याने कार देखील रस्त्याच्या मध्यभागी उतरली. शुक्रवारी (दि.12) सकाळी हे दोन अपघात घडले. यामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र नवीन काँक्रिटीकरण महामार्गाच्या या परीस्थितीमुळे एखादा मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे महामार्ग प्राधिकरण व या महामार्गाचे ठेकेदार असलेल्या कल्याण टोल वे या कंपनीच्या अधिकार्यांचे लक्ष नसल्याने वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आधी डांबरीकरण आणि आता नव्याने नवीन तंत्रज्ञान वापरून सुरु असलेल्या महामार्गाचे सिमेंट कॉक्रीटीकरण यावर चार पटीने अधिक खर्च होवूनही पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या दरम्यान सुरु असलेले चौपदरीकरणाचे काम अपूर्णच आहे. या पहिल्या टप्प्यात अनेक ठिकाणी उड्डाणपूल, सर्विस रोडची कामे अद्यापही अपूर्णच आहेत. याआधीही अनेक निरपराध लोकांचे प्राण घेतलेल्या तसेच अनेकांना अपंगत्व आणणार्या मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे कासवगतीने सुरु आहे. नव्याने सुरु असलेल्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कडेला साईड पट्टीला मातीचा भराव टाकून रस्त्याच्या कडेला साईड पट्टी तयार करण्यात आली नाही. तसेच दोन लेनच्या मध्यभागी देखील मातीचा भराव केलेला नाही. असे असतानाच रोज कोणतीतरी एक लेन कामासाठी बंद करून एकाच लेन वरुन वाहतूक सुरु असते. अशावेळी मातीचा भराव न टाकल्याने चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी मातीचा भराव करण्यात आलेला नाही अशा ठिकाणी वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने त्या ठिकाणी अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच नागोठणे जवळील निडी गावाच्या हद्दीत रस्त्याचा अंदाज न आल्याने एसटी बस व टेम्पोची समोरासमोर धडक बसून यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. भविष्यात मातीचा भराव टाकून साईड पट्टी तयार करण्यात आल्या नाहीत तर एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे महामार्ग प्राधिकरण व या महामार्गाचे ठेकेदार असलेल्या कल्याण टोल वे कंपनीच्या अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी प्रवासी, वाहन चालक व नागरिकांकडून होत आहे.
साईड पट्टी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र ज्या प्रमाणावर मातीची आवश्यकता आहे तेवढी चांगल्या दर्जाची माती आम्हाला मिळत नसल्यामुळे भराव टाकून साईड पट्टी तयार करण्याचे काम सद्यस्थितीत अपूर्ण आहे. परंतु लवकरच चांगल्या दर्जाची माती उपलब्ध करून येत्या पंधरा दिवसांत साईड पट्टी तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल.
योगेश जगताप,
अधिकारी – कल्याण टोल वे कंपनी