। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे परिसरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सध्या चांगलाच वेग आला आहे. मात्र, महामार्गाच्या कामात येथील रेल्वे स्थानकाकडे जाणार्या महामार्गावर तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या वळणदार व अरुंद सर्व्हिस रोडमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व्हिस रोडची रुंदी वाढवावी, अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांत होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम नागोठणे हद्दीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे पासून सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरात सुरू आहे. नागोठण्यातील याच अंतरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात चार उड्डाण पुलांचे व रस्ता रुंदीकरणाचे कामही जोरात सुरू आहे. नागोठणे हद्दीत असाच एक उड्डाणपूल नागोठणे रेल्वे स्थानकाकडे जाणार्या रस्त्यासमोर उभारला जात आहे. पुलाचे काम सुरू असतानाच वाहनांना ये-जा करण्यासाठी नागोठणे रेल्वे स्थानकाकडे जाणार्या रस्त्याला लागूनच एक तात्पुरता सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. मात्र, हा सर्व्हिस रोड वळणदार व अरुंद असा तयार करण्यात आला आहे.
या बाह्य वळणदार सर्व्हिस रोडवर ट्रक, कंटेनर, ट्रेलर, टँकर, एसटी यांसारखी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर दोन वाहने समोरासमोर धडकून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागोठणे रेल्वे स्थानकात थांबणार्या गाड्यांमधून मोठ्या संख्येने उतरणारे प्रवासी महामार्गावरून चालत जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचा धोका
