50 टपरीधारकांना कारवाईच्या नोटिसा
| नेरळ | प्रतिनिधी |
कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या जागेत दुकाने थाटून व्यवसाय केले जात आहेत. त्या टपरीधारकांमुळे त्या रस्त्यांवर अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तक्रारी नंतर नेरळ ग्रामपंचायत कारवाई करणार असून 50 अतिक्रमणधारक यांना नोटिसा बजावल्या असून, येत्या शनिवारी ही कारवाई होणार आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गणेश घाट परिसर तसेच डम्पिंग ग्राऊंडपर्यंत दुकानदारांनी रस्त्यावर माल ठेवून जागा अडवली आहे. त्याचवेळी टपरीधारकांनी व्यवसाय करताना रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्याचवेळी त्या टपरीधारकंच्या व्यवसाय ठिकाणी वाहने उभी राहिलेली असतात. त्यामुळे अपघाताची स्थिती निर्माण होत असल्याने सर्व अतिक्रमणे काढून टाकावीत, अशी मागणी करणारे निवेदन हनिफ शमीम शेख आणि राजीव मुकुंद केतकर यांनी दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून सर्व टपरीधारक अतिक्रमण करणार्यांना लेखी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
हनिफ शेख आणि राजीव केतकर यांच्या तक्रारी नुसार ग्रामपंचायत नेरळ हद्दीत कर्जत -कल्याण रोड नजीक अनधिकृत टपरीधारक रहदारीचा रस्ता आणि गटारावर दुकानाबाहेर रेतीच्या पिशव्या तसेच इतर समान कर्जत-कल्याण महामार्गावर ठेवत आहात. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत आणि नागरिकांच्या तोंडी तक्रारीही येत असतात. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून खासगी माल आणि पत्रे, सिमेंट, स्टील, रेती, भंगार अशा वस्तू रस्त्याच्या दोन्ही बाजूस राजरोसपणे ठेवत आहे. तसेच दुकानदार त्याचा कचरा गटारात टाकत आहेत. त्यामुळे गटार तुंबल्यामुळे पाणी साचून दुर्गंधी पसरते तसेच मच्छरांचादेखील प्रादुर्भाव वाढू शकतो. गटारावर अनधिकृत बांधकाम केल्यामुळे पावसाळ्यात टाकलेल्या कचर्यामुळे पाणी अडून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यावरील अतिक्रमण केलेला माल काढून घ्यावा व रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा, अन्यथा ग्रामपंचायत नियमाप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करून होणारा खर्च आपणाकडून वसूल केला जाईल, अशी नोटीस बजावली आहे. त्यानुसार नेरळ ग्रामपंचायत येत्या शनिवारी त्या सर्व अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईनंतर नेरळ गणेश घाट परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.