मोकाट गुरांमुळे अपघाताचा धोका

मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

। नागोठणे । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावर ठाण मांडून बसणारी मोकाट गुरे ही वाहन चालकांसाठी दिवसेंदिवस एक मोठी समस्या ठरत आहेत. महामार्गावर बसणार्‍या या मोकाट गुरांची सर्वत्रच मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही मोकाट गुरे सरळ सरळ रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहतुकीच्या समस्येंसह वाहन चालकांना व प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिसरातील शेतकर्‍यांच्या गुरांचा या मोकाट गुरांमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असल्यामुळे या मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांमधून होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकीसाठी महत्वाचे असे वाकण, सुकेळी, खांब, कोलाड नाक्यावर रस्त्यातच मोकाट गुरे उभी अथवा ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित गुरांच्या मालकांचा निष्काळजीपणा येथील प्रवाशीवर्गाच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याने प्रवासी व वाहनचालक चांगलेच त्रस्त झाले आहेत. याच मोकाट गुरांच्या भर रस्त्यामध्येच एकमेकांशी झुंजी होत असतात. त्यामुळे दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच, रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभी असलेली गुरे अंधारात दिसण्यात येत नसल्यामुळे वाहनांना अपघात होऊन अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या मोकाट गुरांच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version