कशेडी घाटात दरडीचा धोका

डोंगर पोखरल्याने अपघाताची भीती

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील रस्ता हा वारंवार घडणारे अपघात आणि दरडी कोसळण्याच्या घटना यामुळे दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून येथील संभाव्य धोक्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. गेल्यावर्षी कापलेल्या डोंगरातून यंदा लाल मातीचे ढिगारे महामार्गावर कोसळू लागले आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कशेडी घाटात करताना महामार्गाच्या तीव्र उतार आणि वळणांवरील डोंगर कापून संबंधित ठेकेदार कंपनी एलअ‍ॅण्डटीकडून डोंगर उभा कापल्यामुळे धामणदेवी हद्दीत डोंगर कोसळण्याचा धोका कायमचा निर्माण झाल्याची भीती धामणदिवीच्या नागरिकांमध्ये उघडपणे व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी या डोंगरातून दरड कोसळल्यानंतर धामणदिवी गावातील काही घरांच्या भिंतीना तडे पडल्याने ठेकेदार कंपनी ’एलऍण्डटी’कडून घरे बाधितांना 1200 ते 2500 रूपयांची भरपाई देऊन बोळवण करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी ठेकेदार कंपनी ’एलऍण्डटी’कडून कायमस्वरूपी धोका निर्माण झाल्याने महामार्गालगतच्या धामणदिवीतील घरांचे भुसंपादन करून स्थलांतर करण्याऐवजी दीडदमडीची भरपाई देण्याचा मार्ग अवलंबिण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे.

कशेडी घाटामध्ये धामणदेवी दत्तवाडी हद्दीत बोगद्याकडे जाणार्‍या नवीन महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, याठिकाणीदेखील दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी तळकोकणात आणि मुंबई दिशेने जाणार्‍या येणार्‍या वाहनांवर दरड कोसळली तर एखादा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. डोंगराचा भाग खाली आला तर हा भुयारांना जोडणारा मार्ग बंद होण्याची शक्यता दिसून येत आहे. याच ठिकाणी चार दिवसांपूर्वी मातीचा ढिगारा खाली घसरत आला होता. भोगाव हद्दीत हायड्रोजन सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक दरीत कोसळून अपघात झाला तेव्हा तसेच दरडी कोसळण्यावेळी घाटरस्ता चर्चेत आणि घाटातील वाहनचालक प्रवासी जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करीत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये आणखी दरडीचा धोका निर्माण झाला असल्याने प्रवासीजनतेसह स्थानिकांनाही धोक्याची टांगती तलवार दिसून येत आहे.

Exit mobile version