चोळई घाटावर दरडींचा धोका; अपघाताचे दुहेरी संकट कायम

। पोलादपूर । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण क्षेत्र आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. हे दुहेरी संकट ओढविण्यामागे प्रशासनच कारणीभूत आहे. कारण नैसर्गिक आपत्ती या सबबीखाली या गावावर ओढविणार्‍या आपत्तींचे वर्णन करून अपघातातील बळींच्या वारसांना मदत आणि आपत्तीप्रवण क्षेत्रात वास्तव्य करणार्‍यांचे स्थलांतर एवढेच काम आपत्ती निवारण कक्षामार्फत केले गेले आहे.

चौपदरीकरणूपर्वी अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या चोळई गावाच्या घाट रस्त्याच्या मार्गिकांचे नवे स्वरूप अपघात टाळण्यासाठी करण्यात आले नाहीत. याउलट नवीन चार पदरी रस्त्यांनाही अपघातप्रवण शिक्का बसेल; एवढे अपघात गेल्या काही आठवडयांपासून चोळई गावालगत कशेडी घाटात झाले आहेत. त्यामुळे चौपदरीकरणानंतरही कशेडी घाटाच्या प्रारंभी वसलेल्या चोळई गावावर दरडप्रवण तसेच अपघातप्रवण क्षेत्राचे दुहेरी संकट कायम असल्याचे यंदा स्पष्ट झाले आहे.

चोळई येथील हनुमान मंदिरालगतच्या संरक्षक कठड्याला धडक देत अनेक महाकाय कन्टेनर, टँकर्स, जीप, व्हॅन आदी वाहने गावाच्या बुरूड समाजाच्या लोकवस्तीपर्यंत जात आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांवर अपघातांची कायम टांगती तलवार आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत या अपघातांची गांभीर्याने दखल घेण्यात आली नसून अद्याप अपघातांची मालिका कायम सुरू आहे.

ग्रामस्थ भीतीच्या छायेत
पावसामुळे घाटातील चोळई येथे दरड कोसळली. गेल्यावर्षी याठिकाणी उत्खननामुळे दरडीचा धोका लक्षात घेऊन चोळईच्या ग्रामस्थांनी उठाव केला होता. यंदा पावसाचा जोर वाढताच चोळई येथील उत्खननाच्या ठिकाणी दरडी कोसळून रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली. प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षेचा उपाय म्हणून चोळई येथील 20 कुटुंबांतील सुमारे 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्यामंदिर पोलादपूर येथे हलविले असल्याचा दावा केला आहे. मात्र, याठिकाणी अनेक ग्रामस्थांनी जीवाच्या भितीने परगावांतील नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्रशासनाची हुकूमशाही
गाव आणि ग्रामस्थ रिकामे करण्यासाठी प्रशासनाने बळाचा वापर केला. मात्र, या घटनाक्रमांमध्ये प्रशासनाने हम करे सो कायदा अशी भुमिका घेतल्याचे दिसून आले. दरडी कोसळल्याच्या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगराचा भाग कापण्यात आला असून पावसामुळे दरडीचे ढिगारेच्या ढिगारे दगड मातीसह महामार्गावर खाली कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले.

Exit mobile version