सुकेळी खिंडीत दरडीचा धोका

संरक्षण भिंत बांधण्याची मागणी

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगराची माती सैल झाली असून, अतिपावसामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, सुकेळी खिंडीत संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली 16 वर्षांपासून सुरु असून, हे काम केव्हा होईल हे सांगता येत नाही. परंतु, या महामार्गावरील सुकेळी खिंडीतील डोंगर चौपदरीकरणासाठी अनेक वर्षांपासून खोदण्यात आले आहेत. यामुळे या डोंगराची माती सैल झाली असून, पावसामुळे डोंगरावर माती दगडगोटे रस्त्यावर येत आहेत. अशावेळी मोठमोठे दगडगोटे महामार्गवरून जाणार्‍या एखाद्या वाहनावर पडले तर मोठा अपघात घडू शकतो. गेल्या वर्षी या डोंगरावरून एक भला मोठा दगड रस्त्यावर आला होता; परंतु एक सेकंदाच्या फरकाने बाजूने जाणार्‍या ट्रेलरवर न पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.

चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हळूहळू दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. दरड कोसळण्याचा धोका हा कायमस्वरूपी बंद होण्यासाठी सुकेळी खिंडीतील दोन्ही बाजूच्या डोंगराला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Exit mobile version