पावसाळ्यात नैसर्गिक संकटे ओढावण्याचा धोका

सतरा गावात पाणी शिरण्याची भिती

| उरण | वार्ताहर |

पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला आहे. तरी ही उरण नगर परिषद व स्थानिक ग्रामपंचायतीने आजतागायत आप आपल्या हद्दीतील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे, झुडपे यांची साफसफाई करण्याची कामे हाती घेतली नाहीत. सिडकोने सिडको बाधित ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांची साफसफाई तसेच खाडी किनार्‍यावरील होर्डींग पाईपची साफसफाई करण्याची कामे हाती घेतली नाहीत. त्यात काहींनी रस्त्या लगतच्या मोर्‍यांच्या तोंडावरच दगड मातीचा भराव टाकल्यामुळे यावर्षी पावसाचे पाणी तालुक्यातील 17 गावांत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नैसर्गिक संकटे ओढावण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी बैठकीच्या माध्यमातून यावर्षी उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित प्रशासनाला आदेश दिले आहेत. परंतु संबंधित शासकीय अधिकारी वर्गानी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करता आप आपल्या परिसरातील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे, झुडपांची साफसफाई केली नाही.

त्यामुळे उरण शहराबरोबरच तालुक्यातील चिरनेर, विंधणे, दिघोडे, वेश्‍वी, चिर्ले, जासई, पागोटे, नवघर, बोकडविरा, भेंडखळ, म्हातवली, केगाव, कोप्रोली, बांधपाडा, सोनारी, करळ, चाणजे या ग्रामपंचायत हद्दीतील गावात पावसाचे पाणी शिरुन पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Exit mobile version