स्वाईन फ्लू, झिकाचा धोका

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पुण्यात झिकाचे रुग्ण आणि ठाण्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता राखण्याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडले आहेत. या विषाणूमुळे ताप, सर्दी, खोकल्यासारखे आजार निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच पुण्यामध्येदेखील झिका आजाराचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. डासांमुळे हा आजार होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यापासून पुणे व ठाणे हे दोन्ही जिल्हे जवळच आहेत. या जिल्ह्यांतून रायगडमध्ये येणार्‍या-जाणार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याला स्वाईन फ्लूसह झिकाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरु करण्यात आली आहे. स्वाईन फ्लूला रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, गर्दीत जाणे टाळणे अशा प्रकारचे आवाहन रुग्णालयांकडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींसह वयोवृद्धांना स्वाईन फ्लूचा धोका असून, प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे, आजारी व्यक्तीने गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी सांगितले आहे. तसेच झिका हा आजार डासांमुळे होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी मच्छरांची पैदास वाढू नये यासाठी उपाययोजना करणे, सखल भागात पाणी साचवून न देणे अशा अनेक प्रकारचे उपाय करण्यात यावेत, असे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version