। राजकोट । वृत्तसंस्था ।
ऋतुराज गायकवाडचा शतकी झंझावात सुरूच राहिला आहे. मध्य प्रदेशविरुद्धच्या सलामीच्या लढतीत 136 धावांची खेळी साकारत महाराष्ट्राला दिमाखदार विजय मिळवून देणार्या ऋतुराज गायकवाडने छत्तीसगडविरुद्धच्या लढतीतही नाबाद 154 धावांची शतकी खेळी करताना महाराष्ट्राला सलग दुसरा विजय मिळवून दिला आहे.
सलग दोन लढतींमध्ये महाविजय संपादन केल्यामुळे महाराष्ट्राचा संघ ङ्गडफ गटामध्ये आठ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. छत्तीसगडकडून मिळालेल्या 276 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्या महाराष्ट्राने अवघे दोन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने 143 चेंडूंत 14 नेत्रदीपक चौकार व पाच खणखणीत षटकारांसह नाबाद 154 धावांची खेळी केली. यश नाहरने 52 धावा फटकावल्या.
नौशाद शेखने 37 धावांची तर राहुल त्रिपाठीने नाबाद 23 धावांची खेळी केली. याआधी अमनदीप खरे (82) व शशांक सिंग (63) यांच्या फलंदाजीच्या जोरावर छत्तीसगडने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 275 धावा केल्या. महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने 67 धावा देत चार मोहरे टिपले. राहुल त्रिपाठीने दोन व तरण ढिल्लोनने एक फलंदाज बाद केला.