सावित्री नदीने गाठली धोका पातळी

शहरात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता



| महाड । प्रतिनिधी ।

गेल्या 48 तासात महाड पोलादपूरच्या सर्व भागांमध्ये पडणार्‍या अतिवृष्टीने पूर सदृश्य स्थिती निर्माण केली असून दोन्ही तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने पहिला भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. महाबळेश्‍वर व पोलादपूर येथे मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने महाड पोलादपूरकरांसाठी आजची रात्र धोक्याची असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. मागील 48 तासात महाड पोलादपूर तालुक्याच्या सर्व ग्रामीण भागांमध्ये तसेच शहरात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून सद्यस्थितीमध्ये महाडच्या महिकावती मंदिराजवळ असणार्‍या शासकीय यंत्रणेनुसार सध्याची या ठिकाणची पाणी पातळी सहा पूर्णांक 50 एवढी आहे. दरम्यान रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने देखील इशारा पातळी गाठली आहे.

महाड तालुक्याच्या रायगड वाळण परिसरामध्ये तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून वाळण विभागात एका ज्येष्ठ नागरिकाचा ओढ्यात पडून वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली आहे.मागील 48 तासात होणार्‍या तुफानी मुसळधार पर्जन्यवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यात स्थानिक प्रशासन येणार्‍या सर्व आव्हानात्मक परिस्थितीला सज्ज असल्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाडमध्ये असणार्‍या एनडीआ एफच्या पथकाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
किल्ले रायगड मार्गावरील गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेला लाडवली पुलाचे काम पूर्ण झाल्याने पडणार्‍या मुसळधार पावसाची नोंद घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गावरून छोट्या वाहनांमधून जाण्यासाठी हा मार्ग खुला केल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील सुमारे पाच हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील एक महिन्यापासून या पुलाच्या झालेल्या विलंबाच्या कामाने नागरिकांना सात दिवस पर्यायी मार्गावरून सुमारे पाच किलोमीटर लांबीचा वळसा घालून महाड शहरामध्ये जावे लागत होते. मात्र आज सकाळपासून छोट्या वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात आल्याची माहिती प्रशासनामार्फत तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसानंतर जड वाहनांना या मार्गावरून जाण्याच्या परवानगी बाबत निर्णय घेण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे .

रायगड जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे पाच कच्च्या घरांचे तर एका पक्क्या घराचेनुकसान झाले आहे. नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर प्रशासननेसुरु केले आहे. यामध्ये अलिबाग तालुक्यातील वाघ्रणयेथील जनाबाई किसान पाटील यांच्या पक्क्या घराचे अंशतः नुकसान झाले. तळातालुक्यातील चरई लाल माती आदिवासीवाडी येथील गोपाळ सीताराम हिलम , महाड तालुक्यातील नेराव येथील अनुसया जयराम कोरपे, पार्वती कोरपे आणि माणगाव तालुक्यातील कोल्हाण येथील अजित सीताराम कदम, अर्चना पावसकर यांच्या कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील पांगारी येथील स्मशानभूमीचीशेडचे नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झाले आहे.

कुंडलिकेने गाठली इशारा पातळीरायगड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे अशीच काहीशी स्थिती रोहा तालुक्यात आहे. रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला आहे. सकाळी ही पाऊस जोरदार तालुक्यात पडत होता. त्यामुळे डोंगर माथ्यावरून येणारे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदीत तुडुंब भरून वाहू लागले चे चित्र दिसून येत आहे. दुपारी रोहा अष्टमी पुलाला पाणी लागले होते. रोहा अष्टमीला जोडणारा जुना पुल वाहतुकीस बंद ठेवण्यात आल्या आहे. वाहतूक ही नव्या पुलावरून सुरू आहे.रोहा नागोठणे मार्गावरील अष्टमी येथे रस्त्यावर पाणी आले होते. रात्री काही ठिकाणी पाणी आले होते.

Exit mobile version