ऐन शिमग्यात प्रवासात पुन्हा अडथळ्यांची बाधा; प्रशासन जागा मालकांची समजूत घालण्यास मागे
। आंबेत । गणेश म्हाप्रळकर ।
आंबेत पूल सावित्री खाडीवरील पुलाच्या तांत्रिक अडचणींमुळे गेले महिनाभर बंद होता. एकीकडे पर्यायी वाहतूक नसल्याने प्रवासी वर्गाचा मोठा खोळंबा होत होता. हीच बाब लक्षात घेत स्थानिक नागरिकांनी प्रशासनास अनेक निवेदन देऊन ही बाब मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.
तदनंतर तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आंबेत- म्हाप्रळ परिसरात रो-रो सेवा दाखल झाली, मात्र स्थानिक जागा मालकांचा चिघळलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून त्यातील एका जागा मालकाने आंबेत परिसरातील बंदर भागात असलेल्या जेटी शेजारी बांबूं उभे करून रस्ता अडवून जोपर्यंत आपल्या जागेचा प्रश्न प्रशासन मार्गी लावत नाही तोपर्यंत आपण ही जागा वापरू देणार नाही, अशी अट प्रशासनासमोर ठेवली आहे.
त्यामुळे ऐन शिमगोत्सवात प्रवासी वर्गाची चिंता वाढली आहे. त्यामुळे दुसरीकडे आंबेत-म्हाप्रळ परिसरात जंगलजेटी दाखल झाल्याचा आनंद व्यक्त होताना दिसतोय तर दुसरीकडे जागेचा वाद आडवा आल्याने हा प्रवास पुन्हा बंद पडणार का, असे एक ना अनेक प्रश्न उद्भवताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर हा वाद मिटवावा. जेणेकरून प्रवासात अडथळा निर्माण झालेली परिस्थती मार्गी लागेल.
संबंधित जागा अडवण्यासाठी कोणतीच हरकत नसून प्रशासनाने गट नंबर तपासून संबंधित जागा मालकांना आपली दिशा आणि क्षेत्र दाखवून द्यावे. जेणेकरून कोणाची कुठे आणि किती जागा आहे ते कळेल.
-मजिद झटाम, जागा मालक