रस्ते, गटारांच्या अपूर्ण कामांमुळे मोठे संकट
पावसाळ्यात जीवित, वित्तहानीचा धोका
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात विकासकामांचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, एमएसआयडीसी विभागाच्या सुमारे 57 कोटी रुपयांच्या थकीत बिलांमुळे अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील रस्ते, गटारे व जलनियोजनाची कामे अपूर्ण अवस्थेत पडली आहेत. पावसाळा तोंडावर असताना ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
थकीत देयकांमुळे अनेक कंत्राटदारांनी कामे थांबवली असून, अलिबाग-चौल-मुरुड मार्गासह विविध ठिकाणी रस्ते आणि गटारांची कामे अपूर्ण राहिली आहेत. उन्हाळ्यातच रस्त्यांची दुरवस्था वाढली असताना, पावसाळ्यात पाणी साचणे, गटारे तुंबणे आणि डोंगरदऱ्यांमधून अनियंत्रित पाण्याचा प्रवाह यामुळे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
चौल परिसरातील बागायती शेतजमिनींमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात असून, त्यामुळे आर्थिक नुकसानासोबत जीवितहानीचीही शक्यता नाकारता येत नाही. “पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण झाली नाहीत, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल,” असा इशारा स्थानिक शेतकरी देत आहेत.
“शासनाने एवढी मोठी रक्कम का थकवली? कंत्राटदारांची चूक काय आणि जनतेचा गुन्हा काय?” असे तीव्र प्रश्न आता रायगडकर उपस्थित करत आहेत. सामाजिक संघटना आणि सुज्ञ नागरिकांनीही इशारा दिला आहे की, गटारे आणि जलनिस्सारण व्यवस्था अपूर्ण राहिल्यास शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. मुरुड तालुक्यातील ग्रामस्थांनी या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला असून, प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. या गंभीर परिस्थितीतही महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. थकीत बिलांमागील कारण अद्याप अस्पष्ट असल्याने संशय अधिकच गडद होत आहे.
पावसाळ्यापूर्वी तोडगा निघणार?
पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, अपूर्ण कामे, ठप्प प्रकल्प आणि थकीत बिले यामुळे रायगड जिल्ह्यातील लाखो नागरिक संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. शासनाने तात्काळ निधी वितरित करून कामे पूर्ण केली नाहीत, तर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बांधकामासाठी आवश्यक असणारे साहित्य मिळत नसल्यामुळे कामे ठप्प आहेत. ठराविक ठिकाणी कामे संथ गतीने सुरू आहेत.
– बी. के. सिंग, अभियंता, एमएसआयडीसी
