रस्त्याचे डांबरीकरण नित्कृष्ट दर्जाचे

ग्रामस्थांचा आरोप

नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील अंत्राट वरेडी ते गुडवण आणि त्यापुढे लोभ्याची वाडी या रस्त्याचे सध्या सुरु असलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर हाताने किंवा पायानेसुद्धा निघून जात आहे. दरम्यान, या नित्कृष्ट डांबरीकरण कामाची शासनाच्या भरारी पथकाने चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नेरळ तळवडे पिंपळोली काळेवाडी अंत्राट वरेडी ते गुडवण आणि पुढे सुगवे फाटा आणि पुढे मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महारमार्गाचा भाग वगळून हा रस्ता पुन्हा सुगाव गाव ते पत्राची वाडी होऊन पुढे लोभेवाडी असा कशेळे-खांडस गणेश घाट रस्त्याला जाऊन मिळतो. या रस्त्यावर अंत्राट वरेडी-गुडवण-सुगवे फाटा ते लोभेवाडी असा रस्ता बनविला जात आहे.  या रस्त्यावर कार्पेट डांबरीकरण पूर्ण झाले असून, ते कार्पेट डांबरीकरण होऊन जेमतेम तीन दिवस झाले आहेत. कार्पेट डांबरीकरणाचा थर हा स्थानिकांनी हाताने किंवा पायाने देखील निघून जातो असे निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, ठेकेदाराने 12 मे रोजी पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेच्या भागात रोलिंग करून घेतल्याचा आरोप ग्रामस्थ गोपाळ डायरे आणि मधुकर डायरे यांनी केला आहे.

आता रस्ता झाला की पुन्हा दहा वर्षे रस्ता होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अंत्राट वरेडी-गुडवण या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.
– गोपाळ डायरे, ग्रामस्थ

नव्याने केलेले कार्पेट डांबरीकरण गरम असल्याने ते सहज साध्या हाताने निघू शकते. मात्र, ग्रामस्थांनी कुठे कुठे रस्ता खराब झाला आहे याची माहिती दिल्यास ते काम आपण पुन्हा करून घेऊ. रस्ता अधिक टिकाऊ कसा होईल याकडे प्राधान्याने लक्ष देऊ.
– संजीव वानखेडे, उपअभियंता, कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग 

Exit mobile version