दस्तुरी नाका येथील रस्ता लिदमुक्त; माथेरान पालिकेने केली स्वच्छता

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान या पर्यटन स्थळी सुरु असलेल्या विकास कामे सुरु असून त्या विकास कामांसाठी लागणारे साहित्य वाहून नेण्यासाठी घोड्यांचा वापर केला जातो. हे सर्व घोडे माथेरानच्या दस्तुरी नाका येथून साहित्य पाठीवर टाकून नेट असतात. त्या भागात 400 हुन अधिक घोड्यांची सुरु असलेली वर्दळ यामुळे हा दस्तुरी नाका येथील वाहनतळ ते मालधक्का या भागातील रस्ता घोड्यांच्या लिदने भरून गेला होता. त्यामुळे या रस्त्यावर पालिकेचे कर्मचारी लावून साफसफाई करण्यात आल्याने 200 मीटर लांबीचा घोड्यांच्या लिदने भरलेला रस्ता लिदमुक्त झाला आहे.
मालधक्का रस्त्यावर 400 हुन अधिक मालवाहतूक करणारे घोडे प्रवास करीत असतात. हे मालवाहतूक करणारे घोडे त्याच भागात मुक्काम करीत असतात. त्यामुळे घोड्यांची विष्टा हि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडत असते. त्यामुळे पायी प्रवास करणारे पर्यटक आणि स्थानिक यांच्या आरोग्यास ते अपायकारक आहे.तसेच पावसाळ्यात घोड्यांची हि लिद पावसाच्या पाण्यासोबत जंगलात आणि दरीत वाहून जाऊन झाडांना धोका पोहचु शकतो आणि त्यामुळे ती लिद उचलण्यात यावी अशी मागणी माथेरान नागरपरिषदेकडे पर्यटक तसेच निसर्गप्रेमी यांनी केली होती.
ही समस्या लक्षात घेऊन माथेरान नगरपरिषदेच्या प्रशासक आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी स्वतः मालवाहतूक करणारे घोडे थांबतात त्या भागात जाऊन पाहणी केली. त्यानंतर दोन दिवसात त्या भागातील लिद तेथून भरून कचरा डेपोकडे नेली आहे. तसेच आता त्या भागात व्यवसाय करणारे घोडे मालक यांनी घोड्याची विष्ठा तात्काळ स्वतः गोळा करावी आणि अन्यत्र नेवून टाकावी अशी सूचना पालिकेच्या मुख्याधिकारी भणगे यांनी केली आहे. माथेरान पालिकेच्या या भूमिकेचे स्वागत माथेरान संयुक्त वन व्यवस्थापन समितीने केले आहे.

या लिदीमुळे पावसाळ्यामध्ये ही दुर्गंधी वाढून आरोग्यला धोका निर्माण झाला असता. बरेच पर्यटक, हात रिक्षा चालक, घोडेवाले, कुली आणि मालवाहतूक करणारे या मार्गने जातात. त्यामुळे त्वरित निर्णय घेऊन सदरील लिद काढण्यात आली असून इथून पुढे नियमित या रस्त्याची स्वछता नगरपरिषदेकडून राखली जाईल व तशा सूचना स्वछता विभागाला देण्यात आल्या आहेत.

सुरेखा भणगे-शिंदे, मुख्याधिकारी तथा प्रशासक माथेरान

Exit mobile version